पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उभारण्यात आलेल्या दिवंगत अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत होते. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला ‘अजितदादा पवार प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात आले असून, त्यानंतर नेहरू मेमोरियल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात अमित शाह यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला.
सहकार क्षेत्राचे चालते-बोलते ज्ञानकोश
अजित पवार हे ग्रामीण विकास आणि सहकार क्षेत्राचे चालते-बोलते ज्ञानकोश होते, असे अमित शाह म्हणाले. दूध संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, साखर कारखाने, नागरी सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांच्या कामकाजाची त्यांना सखोल माहिती होती. त्यांची कार्यपद्धती नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी विद्यापीठाप्रमाणे असल्याचे शाह यांनी सांगितले.
अजित पवार यांचे पुणे जिल्हा, बारामती आणि पिंपरी-चिंचवड यांच्याशी असलेले नाते अतूट होते. सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही त्यांनी जमिनीशी असलेली नाळ कायम ठेवली. सामान्य माणसाच्या प्रश्नांप्रती त्यांची बांधिलकी आणि एखाद्या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्याची हातोटी विलक्षण होती, असे शाह म्हणाले. कोविड काळातील त्यांची कार्यतत्परता आणि नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्नही त्यांनी अधोरेखित केले.
वित्तमंत्री म्हणून आर्थिक शिस्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या शिस्तीचे आणि निर्णयक्षमतेचे कौतुक केले. ते कणखर, शिस्तप्रिय आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व होते. सकाळी सहा वाजता कामासाठी तयार होऊन सात वाजल्यापासून कामाला सुरुवात करण्याची त्यांची शिस्त सर्वांनी अनुभवली आहे, असे फडणवीस म्हणाले. वित्तमंत्री म्हणून त्यांनी आर्थिक शिस्त राखण्यावर भर दिला. विकासकामांमध्ये निधीचा योग्य विनियोग आणि कामांची गुणवत्ता याबाबत ते आग्रही असत. अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचा अहवाल लवकर मिळावा, अशी विनंती आपण अमित शाह यांच्याकडे केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना पुणे जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार संबोधले. पुणे मेट्रो, रिंग रोड आणि वाहतूक कोंडी सोडविण्याच्या प्रकल्पांमध्ये त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा क्षण भावनिक असल्याचे सांगत अजित पवार यांचा विकासाचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्रत्येक गावात, शाळेत आणि आरोग्य केंद्राच्या परिसरात झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान सुनेत्रा पवार या भावुक झाल्या होत्या.
यावेळी ‘कर्मयोगी दादा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. अजित पवार यांच्या जीवनकार्यावर आधारित दुर्मिळ छायाचित्रांच्या ‘ट्रिब्युट गॅलरी’लाही मान्यवरांनी भेट दिली. आरोग्य, शिक्षण, सिंचन, जलसंधारण, ई-गव्हर्नन्स, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासातील त्यांच्या योगदानाचा आढावा या प्रदर्शनातून मांडण्यात आला.
Leave a Reply