दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचे गूढ वाढतच चालले आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या या विमान अपघाताला नऊ महिने पूर्ण झाले, तरी अद्याप एफआयआर दाखल झाली नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आज पुन्हा या प्रकरणावर सादरीकरण केले.
मफलरमॅन कोण? फोटो सादर
गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार हे या विमान कंपनीला आणि कंपनीच्या मालकाला वाचवणाऱ्या ‘मफलरमॅन’चा खुलासा करणार असल्याचे सांगत होते. आज त्यांनी एक फोटो सादर करत तो मफलरमॅन म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे जाहीर केले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनीच अपघात घडवल्याचे आपण म्हणत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस हे व्हीएसआर या विमान कंपनीला वाचवत असल्याचा दावा त्यांनी केला.
सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याचे आव्हान
व्ही. के. सिंग यांची दिल्ली विमानतळावर रात्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला. फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी त्या रात्रीचे दिल्ली विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून आपले निर्दोषत्व सिद्ध करावे, असे आव्हान त्यांनी दिले. दिल्लीत रजत शर्मा यांच्या मुलाच्या लग्नाला फडणवीस गेले होते. त्यावेळी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान विमानतळावर व्ही. के. सिंग त्यांना भेटले आणि त्यांनी फडणवीस यांना एक फाईल दिली, असा दावा रोहित पवार यांनी केला. हवे तर दिल्ली विमानतळाचे सीसीटीव्ही तपासा, असेही ते म्हणाले.
दरम्यान, फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा अपघाताशी किंवा घातपाताशी संबंध नसावा, असे मतही रोहित पवार यांनी व्यक्त केले. फोटोत सोबत राघव शर्मादेखील असल्याचे त्यांनी सांगितले. व्ही. के. सिंग यांच्या जवळचे संबंध मुख्यमंत्र्यांचे असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
Leave a Reply