जळगावात महाराष्ट्र केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सुनील भंगाळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. भाषण करताना पाटील यांनी महाजन यांच्याबद्दल मिश्किल टिप्पण्या केल्या.
महाजन हे ज्येष्ठ बंधू, पण एक तास उशीर
भाषणाच्या सुरुवातीला पाटील यांनी महाजन यांचा उल्लेख ज्येष्ठ बंधू असा केला. महाजन यांचे वय ६७ वर्षे, तर आपले वय ६० वर्षे असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात रुग्णांची सेवा करण्याइतके समाधान दुसऱ्या कोणत्याच कामात मिळत नाही, असे ते म्हणाले. त्रास देणाऱ्याला त्रास देणारे आपण आहोत, असेही त्यांनी नमूद केले. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवरूनही त्यांनी टीका केली.
आपल्याकडे अनेक प्रकारचे लोक येतात, घर नांदत नाही अशा महिलाही येतात, त्यामुळे आपण सामान्य डॉक्टरांप्रमाणे काम करतो, असे पाटील म्हणाले. २८८ पैकी २६५ आमदारांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यालाही रक्तदाब आणि मधुमेह आहे, तरी दुपारी बारा वाजल्यापासून आपण महाजन यांच्यासाठी उपाशी बसून वाट पाहत होतो, असे म्हणत त्यांनी महाजन एक तास उशिरा आल्यावर टोला लगावला.
जिल्हा बँक निवडणुकीवरूनही निशाणा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरूनही पाटील यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला. या निवडणुकीत पाटील आणि त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासमोर भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या उमेदवारांनी माघार घ्यावी, अशी सूचना पाटील यांनी महाजन यांना केली. महाजन हे संकटमोचक असून लय लफडेबाज माणूस असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.
Leave a Reply