मुंबईतील रुग्णालयीन क्रिकेटपटूंसाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हिंदुजा आणि टाटा रुग्णालयांच्या आयोजनात होणाऱ्या या स्पर्धेत मुंबईतील १६ नामांकित रुग्णालयांचे संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत. स्पर्धेचा पहिला सामना एलिट गटातील ब्रीच कँडी आणि कोकिळाबेन अंबानी या दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे.
१९९४ पासून अखंड परंपरा
गेली ३३ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या स्पर्धेने मुंबईच्या क्रिकेटविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदुजा आणि टाटा रुग्णालयातील क्रिकेटप्रेमी कर्मचाऱ्यांच्या जिद्दीतून आणि अथक परिश्रमांतून ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे.
मिलिंद सावंत आणि डॉ. हुमायू जाफरी यांच्या पुढाकारातून १९९४ मध्ये या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील क्रिकेटपटूंना क्रिकेटच्या माध्यमातून व्यासपीठ मिळावे आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेचे उद्घाटन १७ नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. उन्मेष खानविलकर, कोषाध्यक्ष अरमान मलिक आणि स्पर्धा सचिव विघ्नेश कदम यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कच्या बंगाल क्लबमध्ये होणार आहे. याप्रसंगी सर्व संघांना किटचे वाटप केले जाणार असल्याची माहिती आयोजक मिलिंद सावंत यांनी दिली.
दोन गटांत रंगणार स्पर्धा
यंदाची स्पर्धा एलिट आणि प्लेट अशा दोन गटांत रंगणार आहे. एलिट गटात नानावटी, हिंदुजा, टाटा, जे. जे., केईएम, जसलोक, ब्रीच कँडी आणि कोकिळाबेन अंबानी या आठ संघांचा समावेश आहे. प्लेट गटात बॉम्बे, हिरानंदानी, रहेजा, लोकमान्य टिळक, कस्तुरबा, लीलावती आणि ग्लेन ईगल्स हे संघ आपले कौशल्य पणाला लावतील.
या स्पर्धेने केवळ रुग्णालयीन क्रिकेटपटूंना व्यासपीठ दिले नाही, तर मुंबई क्रिकेटला नंदू पाटील, अविनाश जाधव, जीतेंद्र परदेशी, ओंकार जाधव, श्रीकांत दुधवडकर आणि प्रदीप क्षीरसागर यांच्यासारखे गुणवंत क्रिकेटपटूही दिले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा केवळ रुग्णालयांमधील क्रिकेटची चुरस नसून नव्या प्रतिभेला संधी देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरली आहे.
स्पर्धेच्या दिमाखदार आयोजनासाठी गिरनार रुग्णालय स्पर्धा समितीचे अध्यक्ष जॉय चक्रवर्ती, सचिव डॉ. हुमायू जाफरी, कोषाध्यक्ष मिलिंद सावंत आणि संयुक्त सचिव अनिल बैकर विशेष मेहनत घेत आहेत. ३३ वर्षांची समृद्ध परंपरा, १६ संघांचा सहभाग आणि प्रतिष्ठेचे विजेतेपद यामुळे यंदाच्या स्पर्धेतही क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
Leave a Reply