धुळे शहरातील पेठ भागात महापालिकेने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलनाची धडक मोहीम तीव्र केली आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे विस्कळित झालेली वाहतूक आणि नागरिकांची वाढती गैरसोय लक्षात घेत ही कारवाई करण्यात आली. शहरातील वर्दळीच्या फुलवाला चौकासह गल्ली क्रमांक चार परिसरात बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी महापालिकेने धडक कारवाई करत जेसीबीने अनधिकृत वाढीव शेड, टपऱ्या, ओटे आणि हातगाड्या हटविल्या.
रस्ते मोकळे, वाहतूक सुरळीत
या कारवाईमुळे परिसरातील रस्ते मोकळे झाले असून, वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न काही दिवसांपासून पुन्हा ऐरणीवर आला होता. यापूर्वीही प्रशासनाकडून संयुक्त मोहिमा राबविण्यात आल्या होत्या; मात्र कारवाईनंतर अल्पावधीतच पुन्हा बस्तान मांडल्यामुळे स्थिती पूर्वपदावर येत होती.
रस्त्यांवर झालेले अतिक्रमण आणि हातगाड्यांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही कारवाई केली.
पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी देखरेखीची गरज
अनपेक्षित झालेल्या या धडक कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये धावपळ उडाली. वाहतूक सुरळीत राहणे आणि नागरिकांना विनाअडथळा ये-जा करता यावी, हा मोहिमेचा मुख्य उद्देश असला तरी काढलेल्या जागी पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी नियमित देखरेख ठेवणे गरजेचे आहे. फुलवाला चौकाप्रमाणेच शहरातील इतर प्रमुख चौक व बाजारपेठांमधील अतिक्रमणांवरही सातत्याने बडगा उचलावा, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.
Leave a Reply