गर्भधारणेचे नियोजन करताना सहसा महिलांच्या आहाराकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र पुरुषांचे आरोग्यही गर्भधारणेसाठी तितकेच महत्त्वाचे असते. शुक्राणूंची निर्मिती आणि त्यांची गुणवत्ता चांगली रहावी, तसेच शरीराला आवश्यक पोषक घटक मिळावेत, यासाठी फोलेट हे जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे बाबा होण्याचे नियोजन करणाऱ्या पुरुषांनीही आपल्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेतल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतेच, असे नाही. त्यामुळे या गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
फोलेट म्हणजे काय आणि ते कुठून मिळते
फोलेट हे व्हिटॅमिन बी ९ चे नैसर्गिक स्वरूप आहे. ते हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, वाटाणे, लिंबूवर्गीय फळे आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध अशा तृणधान्यांमधून मिळते. फॉलिक ॲसिड हे याच जीवनसत्त्वाचे पूरक स्वरूप आहे. शरीरातील पेशींची निर्मिती आणि डीएनए तयार होण्यासाठी फोलेट आवश्यक असते. निरोगी शुक्राणूंच्या निर्मितीसाठी तसेच त्यांच्या आनुवंशिक घटकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने फोलेट अतिशय गरजेचे आहे. शुक्राणूंची निर्मिती होण्यासाठी शरीरात पेशींची योग्य वाढ आणि डीएनएची निर्मिती होणे आवश्यक असते आणि या प्रक्रियेत फोलेटची भूमिका महत्त्वाची आहे. शरीरात फोलेटची कमतरता असल्यास शुक्राणूंच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल आणि आकारमान यांचा फोलेटच्या पातळीशी काही संबंध आहे का, याविषयी संशोधन करण्यात आले आहे.
शुक्राणूंमधील डीएनएची गुणवत्ता का महत्त्वाची
शुक्राणूंमधील डीएनएची गुणवत्ता ही देखील पुरुषांच्या प्रजननक्षमतेसाठी महत्त्वाची असते. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि काही पोषक घटकांची कमतरता यामुळे शुक्राणूंमधील आनुवंशिक घटकांचे नुकसान होऊ शकते. डीएनएच्या निर्मितीसाठी फोलेट आवश्यक असल्याने शुक्राणूंच्या आरोग्याच्या दृष्टीनेही त्याचा अभ्यास केला जात आहे. मात्र फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेतल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते किंवा गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते, याबाबत अद्याप ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे पुरुषांमधील वंध्यत्वावर फॉलिक ॲसिड हा खात्रीशीर उपाय समजू नये.
आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष द्या
पालकत्वाचे नियोजन करणाऱ्या पुरुषांनी संतुलित आणि पोषक आहाराच्या सेवनावर भर द्यावा. हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, वाटाणे, संत्री यांसारखी लिंबूवर्गीय फळे आणि फोलेटयुक्त धान्यांचा आहारात समावेश करावा. यासोबत झिंक, व्हिटॅमिन बी १२ आणि शरीराला आवश्यक असलेले इतर पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळणेही महत्त्वाचे आहे. फोलेटची कमतरता आढळल्यास, आहारातून पुरेसे पोषण मिळत नसल्यास किंवा काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये डॉक्टर फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देऊ शकतात. मात्र प्रत्येक पुरुषाने गर्भधारणेचे नियोजन करताना फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेणे आवश्यक असेलच असे नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त मात्रेत या गोळ्या घेणे टाळावे. फॉलिक ॲसिडचे अतिप्रमाण घेतल्याने बऱ्याचदा व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे दिसत नाहीत आणि त्यामुळे निदानास विलंब होण्याची शक्यता असते. शुक्राणूंचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ एका जीवनसत्त्वावर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि धूम्रपान व मद्यपान टाळावे. दीर्घकाळ प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसल्यास पुरुषांनीही प्रजननक्षमतेची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये वीर्याची तपासणी आणि आवश्यकतेनुसार इतर वैद्यकीय तपासण्यांचा समावेश असू शकतो. एकूणच, फोलेट हे केवळ महिलांसाठी महत्त्वाचे नसून पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठीही आवश्यक आहे. योग्य पोषण, निरोगी जीवनशैली आणि योग्य वैद्यकीय सल्ला यांमुळे प्रजनन आरोग्याची योग्य काळजी घेता येऊ शकते.
Leave a Reply