मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रोहित पवारांचा भाजप नेत्यांना सडेतोड पलटवार

मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधल्यानंतर भाजप नेत्यांनी रोहित पवारांवर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पलटवार केला.

रोहित पवारांचा भाजप नेत्यांना सडेतोड पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. आज पुन्हा एकदा रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना सडेतोड उत्तर दिले.

योग्य वेळी योग्य उत्तर

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर रोहित पवार माध्यमांशी बोलले. “मी याठिकाणी फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. इथे कोणतीही राजकीय भूमिका मी मांडणार नाही. योग्य वेळेस योग्य उत्तर मी देईन. माझी बांधिलकी विचारांशी आहे, अजितदादांशी आहे आणि महाराष्ट्रातील जनतेशी आहे. जे नेत्यांशी बांधिलकी ठेवतात, जे गेले काही दिवस बोलत आहेत, त्यांना उत्तर देणे मला गरजेचे वाटत नाही,” असे आमदार रोहित पवार म्हणाले.

सत्यजित तांबे यांच्या टीकेवर पलटवार

यावेळी बोलताना रोहित पवार यांनी सत्यजित तांबे यांच्या टीकेवरूनही जोरदार पलटवार केला. “कालच्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सत्तेतील नेत्यांना प्रश्न केला आहे. तुम्ही कार्यकर्त्यांचे प्रश्न विचारत आहात. मी मोठ्या नेत्यांना फॉलो करतो. सगळेच ट्वीट करतात, ते मी वाचले पाहिजे किंवा फॉलो केले पाहिजे असे नाही,” असा टोला यावेळी रोहित पवार यांनी लगावला.

बाळासाहेबांची प्रेरणा

दरम्यान, “बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील तमाम जनता त्यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होत असते, त्यांची प्रेरणा घेत असते. आज बाळासाहेब ठाकरे यांचा १४ वा स्मृतिदिन आहे. मराठी स्वाभिमान जपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कार्य केले. त्यांनी पक्ष काढला, संघर्ष केला. त्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, आधीही घेतली होती, आत्ताही घेतली आणि पुढील काळातही प्रेरणा घेऊ, आणि संघर्ष करत राहू,” असे आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance