मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा वळवणारे सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे शांत आहेत. दिल्लीतील जंतरमंतर येथे मोठ्या आंदोलनाची घोषणा त्यांनी केली होती. ज्ञानेश कुमार हेच त्यांचे लक्ष्य होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे. सोशल मीडियावरही ते पूर्णपणे शांत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
नीट प्रकरणातील यशानंतर मोर्चा वळवला
यापूर्वी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर सीजेपीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात आंदोलन पुकारले होते. त्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आणि धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. हा सीजेपीचा सर्वात मोठा विजय मानला गेला. त्यानंतर सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा वळवला. मात्र या आंदोलनाला यश मिळाले नाही. दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला आधीच ब्रेक लावला. जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असे सीजेपीने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते.
दिवाळीनंतरही पुढची दिशा नाही
दिवाळीनंतर पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे अभिजीत दिपके यांनी जाहीर केले होते. मात्र दिवाळी होऊन काही दिवस झाले, तरी सीजेपीच्या आंदोलनाची पुढची दिशा समोर आलेली नाही. ज्ञानेश कुमार यांच्यावर सतत टीका करणारे दिपके आता शांत झाले आहेत. ज्ञानेश कुमार यांचे नाव घेत त्यांनी शेवटची पोस्ट ९ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर या विषयावर कोणतीही पोस्ट करण्यात आलेली नाही. गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. अभिजीत दिपके आणि सीजेपी पुन्हा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का, असा सवाल यादरम्यान उपस्थित केला जात आहे.
Leave a Reply