राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अपघातामागील सत्य अद्याप समोर आले नसल्याचे सांगत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. मात्र, या वेळीही त्यांनी मफलर मॅनचे नाव गुलदस्त्यातच ठेवले.
अपघात की घातपात, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न
रोहित पवार म्हणाले की, दादांच्या अपघातामागे सत्य काय आहे, हे अजूनही आपल्याला समजलेले नाही. ते समजावे, असे सर्वांनाच वाटते. आपण सर्वजण दादांना मिस करतो, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांनी दादांचे काही व्हिडिओ दाखवले. लोकांच्या आणि राज्याच्या हितासाठी दादा निर्णय घ्यायचे, असे सांगत मिश्किलपणे बोलणारा, टीका करणारा नेता आपल्यात नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राजकारणात पवार साहेब आणि दादा यांच्याप्रमाणेच काम करण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचेही रोहित पवार म्हणाले.
अपघात की घातपात, हा सवाल सर्वांनाच पडला आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असे रोहित पवार म्हणाले. आपल्याकडे प्रामाणिक लोक आहेत आणि त्यांच्याकडून माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते, असे त्यांनी सांगितले. माहिती देणाऱ्यांनाही माहीत आहे की, कुणीतरी त्यांची माहिती काढू शकते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. माहिती दिलेल्या लोकांना विचारले असता ते म्हणाले की, आपल्यावर कारवाई होईल तेव्हा होईल, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
साडेनऊ महिन्यांत तपासाबाबत माहिती नाही
साडेनऊ महिन्यांत तपासाबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही, त्यामुळे आपल्या सर्वांना शंका आहे, असे रोहित पवार म्हणाले. घातपात झाला आहे का, याबाबत चौकशी करण्यासाठी सीआयडीकडे तपास देण्यात आला, असे त्यांनी सांगितले. सीबीआयकडे तपास देण्यात येणार, हे आपण बोललो नव्हतो; अजित पवार यांचेच आमदार बोलले होते. सत्ताधाऱ्यांनी विनंती करूनही सीबीआयकडे तपास गेला नाही, असे रोहित पवार यावेळी म्हणाले.
Leave a Reply