दूधासारखा पांढरा रंग, मजबूत बांधा, उंच आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व — बादल नावाच्या घोड्याचे हे वर्णन आहे. सध्या पुष्कर मेळाव्यात बादल आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. सोशल मीडियावर बादलच्या शाही एन्ट्रीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बादल जत्रेत येताच त्याला पाहायला गर्दी जमत असल्याचे या व्हिडिओत दिसते. त्याची चाल, कदकाठी आणि शाही अंदाज पाहून सर्वच त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
व्हायरल व्हिडिओतील बादलची एन्ट्री पाहूनच या घोड्यात काही तरी खास आहे, हे दिसून येते. बादल जत्रेत येताच तिथे असणाऱ्या लोकांची नजर त्याच्यावरच पडते. व्हिडिओत बादलच्या भोवती लोकांचा गराडा पडलेला दिसत आहे. त्याची एन्ट्री आता सोशल मीडियाचा विषय झाली आहे. एका रिपोर्टनुसार, बादलची किंमत पाच कोटी असल्याचे सांगितले जात आहे. त्याला खास संरक्षण देण्यात आले आहे. त्याच्या संरक्षणासाठी १०० बॉडीगार्ड तैनात आहेत. त्यामुळे त्याच्या एन्ट्रीसोबत १०० बॉडीगार्ड येतात तेव्हा सर्वच थक्क होऊन जातात. घोड्याची किंमत आणि सुरक्षेच्या लवाजम्याची माहिती बादलच्या मालकानेच दिली आहे.
पाच कोटींत १५ फ्लॅट
या घोड्याची किंमत पाच कोटी आहे. या पाच कोटीत बदलापूर, टिटवाळा आणि पनवेल या भागात ३० लाखाला एक फ्लॅट या हिशोबाने २ बीएचकेचे १५ फ्लॅट येतील, इतका हा घोडा महागडा आहे.
बादल या जत्रेतील सुपरस्टार घोडा ठरला आहे. बादल आल्यावर त्याला पाहण्यासाठीच लोक जमा होत आहेत, असे नाही. तर जमा झालेले लोक आपसूकच खिशातून नोटा काढून बादलवर त्यांची उधळण करत आहेत. लोकांचा गोंगाट, पैशांची उधळण आणि गाण्याचा दणदणाट या व्हिडिओत पाहायला मिळतो. तसेच बादलही आपल्या टापा उंचावताना दिसत आहे. जणू काही तो नृत्य करतोय असा भास होतो. सध्या तरी पुष्करच्या जत्रेत बादलशिवाय चर्चाच होताना दिसत नाही.
महाराष्ट्रातील घोडेही चर्चेत
पुष्करच्या जत्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आपले खास घोडे घेऊन येतात. मारवाडी जातीच्या घोड्यांचे खास वेगळेपण असते. राजस्थानमधील हे प्रसिद्ध घोडे असतात. वळलेल्या कानांमुळे हे घोडे अत्यंत वेगळे दिसतात.
महाराष्ट्रातून आरडीएक्स आणि अलेक्स नावाचे दोन घोडे आले आहेत. तेही मजबूत असे आहेत. या घोड्यांची किंमतही चर्चेत आहे. आरडीएक्सची उंची ६८.५ आहे, तर अलेक्सची किंमत सुमारे पाच कोटी रुपये आहे. पण बादलपुढे सर्वच घोडे फिके आहेत. त्याचा शाही अंदाज आणि दणदणीत एन्ट्रीमुळे पुष्करच्या जत्रेतील सुपरस्टार घोडा म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जात आहे.
Leave a Reply