बीड जिल्ह्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाभोवतीही निवृत्तीची चर्चा सुरू झाली होती. मात्र गडकरी यांनी स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
जुन्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला
गडकरी यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या एका जुन्या विधानाचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला. आपण फक्त युवकांनी पुढे यावे, असे म्हटले होते. मात्र अनेकांनी त्याचा अर्थ सक्रिय राजकारणातून संन्यास घेत असल्याचा काढला. तो अर्थ पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरात झालेल्या १७ व्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाला हजेरी लावल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही तुमचे काम करत राहा, मी माझे काम करत राहीन.
सोळंके यांच्या घोषणेमुळे माजलगावात चर्चा
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एका कार्यक्रमात आपल्या राजकीय वारसदाराची घोषणा केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण स्वतः उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार नाही, तर पुतण्या जयसिंग सोळंके यांना उमेदवारी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या घोषणेमुळे माजलगावच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. गडकरी यांनी निवृत्ती घेतल्यास नागपूरसह महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र गडकरी यांनी निवृत्तीचा दावा फेटाळल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
Leave a Reply