मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जळगावात ‘ऑपरेशन ऑल आउट’: लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव जिल्ह्यात पहाटेपासून ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहीम राबवण्यात आली. अवैध दारू, जुगार आणि अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.

जळगावात ‘ऑपरेशन ऑल आउट’: लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस दलाने सोमवारी (१६ नोव्हेंबर) पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आउट’ ही विशेष मोहीम राबवली. या एकाच रात्रीच्या धडक कारवाईत अवैध दारू, जुगार आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालवणारे, विनाहेल्मेट दुचाकीस्वार, फरारी संशयित आणि तडीपार गुन्हेगारांची तपासणीही या मोहिमेत करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान पोलिसांनी समन्स आणि वॉरंट बजावणी केली. भंगार दुकाने, पानटपऱ्या, हॉटेल आणि लॉजची तपासणी करून सीईआयआर पोर्टलच्या मदतीने चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात आले. जिल्हाभरातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेच्या पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

अवैध दारू आणि जुगाराविरोधात मोठी कारवाई

गावठी हातभट्टी दारूविरोधात १२४ गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईत ५,७२५ लिटर गावठी दारू आणि २८,१७२ लिटर रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. या प्रकरणात १२ संशयितांवर कारवाई करत २० लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देशी आणि विदेशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी १२ गुन्हे दाखल झाले असून ६१ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाराविरोधातील कारवाईत ८६ गुन्हे दाखल झाले; ६० संशयितांवर कारवाई करत १९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अंमली पदार्थांविरोधात ११ गुन्हे दाखल करण्यात आले, त्यात अंमली पदार्थ सेवनाच्या १० प्रकरणांचा समावेश आहे. कारवाईत ३.२५० किलो गांजा जप्त करण्यात आला असून एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. शस्त्रबंदीच्या कारवाईत दोन तलवारीही जप्त करण्यात आल्या.

वाहतूक नियमभंग आणि हरवलेल्यांचा शोध

मोटर वाहन कायद्यांतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ७७ जणांवर, विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या १३३ जणांवर आणि अनधिकृत पार्किंग करणाऱ्या ६१ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ११ लाख ६९ हजार ३५० रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली.

या मोहिमेत हरवलेल्या १७ जणांचा शोध लावण्यात आला. त्यात पाच महिला, सात पुरुष आणि पाच मुलींचा समावेश आहे. समन्स आणि वॉरंट बजावणीत ३७६ समन्स आणि १६१ वॉरंट बजावण्यात आले. सराईत गुन्हेगार म्हणून नोंद असलेल्या ५०७ जणांची तपासणी करून ११ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर आठ हद्दपार व्यक्तींवर कारवाई झाली. चोरीला गेलेले किंवा हरवलेले ४२ मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत करण्यात आले. मोहिमेदरम्यान एकूण १८० हॉटेल आणि लॉजेसची तपासणी करण्यात आली.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance