बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नाशिकमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन

नाशिकमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काळ्या साड्या परिधान करून जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन केले. शासकीय दर्जा, ग्रॅच्युइटी आणि दरमहा पेन्शन या मागण्या आहेत.

नाशिकमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन

नाशिकमध्ये राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या (आयटक) वतीने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर काळ्या साड्या परिधान करून थाळीनाद आंदोलन करण्यात आले. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधणे, तसेच हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांवर ठोस निर्णय घेणे, ही या आंदोलनाची प्रमुख उद्दिष्टे होती. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, ग्रॅच्युइटीचा लाभ तातडीने लागू करावा आणि निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन सुरू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दोन लाख कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित

महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये राज्यभरात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात सुमारे पाच हजार अंगणवाडी केंद्रांमधून दहा हजार अंगणवाडीसेविका व मदतनीस शासनाच्या विविध योजना आणि सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. मात्र, या योजनेला ५२ वर्षे पूर्ण होऊनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याबाबत शासनाकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

पेन्शनचा प्रस्ताव वीस वर्षांपासून प्रलंबित

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळावी, यासाठी गेल्या वीस वर्षांपासून विविध प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहेत. मात्र, अद्याप पेन्शन योजनेबाबत ठोस आदेश काढण्यात आलेले नाहीत. परिणामी, आयुष्यभर शासनाच्या योजना राबविणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागत असून, अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी नेते राजेश सिंग, आयटकचे राज्य सचिव राजू देसले, पद्मा भुजबळ, संजीवनी वाघमारे, कुसुम गांगुर्डे, सुनंदा जाधव, लता क्षीरसागर, संगीता कासार, जया गरड, जिजा जगझाप, जिजाबाई अहिरराव, अन्नपूर्णा अडसुळे, आशा देवढे, छाया कोतवाल, अरुणा बाबा, कल्पना पाटील, मीराबाई जाधव, पूनम पाटील, राजश्री पानसरे आदी उपस्थित होते.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance