आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता आदित्य रॉय कपूर आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेल्या या अभिनेत्याचा प्रवास क्रिकेटच्या मैदानापासून चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचला आहे. त्याच्या आयुष्यातील काही रंजक टप्पे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत.
क्रिकेटचं स्वप्न आणि सुरुवातीचा प्रवास
लहानपणापासून आदित्यला क्रिकेटची प्रचंड आवड होती. व्यावसायिक क्रिकेटपटू होण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि त्यासाठी त्याने क्रिकेटचं प्रशिक्षणही घेतलं होतं. मात्र सहावी इयत्तेनंतर त्याने हे प्रशिक्षण सोडलं. अभिनेता होण्यापूर्वी त्याने व्हिडिओ जॉकी म्हणून काम केलं होतं. ‘पकाऊ’ आणि ‘इंडियाज हॉटेस्ट’ यांसारख्या कार्यक्रमांमधून त्याने तरुण प्रेक्षकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. बॉलिवूडमध्ये त्याने २००९ मध्ये ‘लंडन ड्रिम्स’ या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर २०१० मध्ये ‘अॅक्शन रिप्ले’ या चित्रपटातही तो सहाय्यक भूमिकेत दिसला. सुरुवातीला छोट्या भूमिका साकारत त्याने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.
कुटुंबाची फिल्मी पार्श्वभूमी
आदित्यच्या कुटुंबाचा मनोरंजन क्षेत्राशी जुना संबंध आहे. त्याचे आजोबा रघुपत रॉय कपूर हे १९४० च्या दशकातील चित्रपट निर्माते होते. त्याची आई सलोमी रॉय कपूर या माजी मिस इंडिया आणि कोरिओग्राफर आहेत. आदित्यचा मोठा भाऊ सिद्धार्थ रॉय कपूर हा प्रसिद्ध चित्रपट निर्माता असून त्याने अभिनेत्री विद्या बालनशी लग्न केलं आहे. तर दुसरा भाऊ कुणाल रॉय कपूर हा अभिनेता आहे. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध आहे.
‘आशिकी २’ने बदललेलं नशीब
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहित सुरी दिग्दर्शित ‘आशिकी २’ या चित्रपटाने आदित्यला खरी ओळख मिळवून दिली. श्रद्धा कपूरसोबत त्याने राहुल जयकर ही भूमिका साकारली. या चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे आदित्य रातोरात लोकप्रिय झाला आणि त्याच्या करिअरला मोठी कलाटणी मिळाली. आज तो चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक मानला जातो.
Leave a Reply