छटपूजेसाठी रविवारी गोदाकाठावर आलेल्या काही भाविकांनी आदल्या दिवशी रामतीर्थ परिसरातील ऐतिहासिक दगडी घाटांच्या पायऱ्यांवर ऑइल पेंटने स्वतःची नावे आणि खुणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. रंगाने पट्टे मारून जागा आरक्षित करण्यात आल्याने नाशिकमध्ये संताप व्यक्त होत आहे. पवित्र घाटांचे विद्रुपीकरण झाल्याने या विषयावरून शहरात चांगलाच वाद पेटला आहे.
छटपूजा हा सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचा पारंपरिक धार्मिक सण आहे. या पूजेला विरोध नसून सार्वजनिक आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करून जागेवर स्वतःचा हक्क सांगण्याच्या प्रवृत्तीला विरोध असल्याची भूमिका गोदाप्रेमींकडून मांडली जात आहे. रामतीर्थ परिसरातील घाटांचा ऐतिहासिक वारसा मोठा असून अशा ठिकाणी रंगाने नावे लिहिण्याच्या प्रकारावर संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
या प्रकरणी मनसेचे पदाधिकारी मनोज घोडके यांनी आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त केला आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास प्रशासकीय कार्यालयासमोर ऑइल पेंट आणून ओतण्यात येईल, अशी भूमिकाही कार्यकर्त्यांनी घेतली होती. सामाजिक स्तरातूनही सार्वजनिक घाटांवर अशा प्रकारे नावे लिहून जागा अडविण्याच्या प्रकाराला विरोध दर्शविला जात आहे.
या प्रकरणाचे पडसाद केवळ नाशिकपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. पिंपरी-चिंचवड आणि बदलापूर आदी ठिकाणीही छटपूजेच्या आयोजनातील सार्वजनिक जागांच्या वापरावरून वाद निर्माण झाले आहेत. छटपूजेच्या धार्मिक परंपरेचा सन्मान राखतानाच ऐतिहासिक वारसा आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी, अशी मागणी होत आहे.
नेत्यांच्या प्रतिक्रिया
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गोदाकाठावर घडलेल्या प्रकाराची माहिती घेणार असल्याचे सांगितले. छटपूजेसाठी नवीन पद्धत पाडायला नको, असे ते म्हणाले. भाविक उत्साहात हा सण साजरा करतात, मात्र त्या उत्साहात घाटांवर नाव टाकणे किंवा रुमाल टाकून जागा आरक्षित करणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी गोदावरीचे स्वरूप आणि सौंदर्य यात बाधा आणणारे किंवा नदी प्रदूषित करणारे कुठलेही कृत्य घडायला नको, असे सांगितले. प्रशासन आणि सरकार रामतीर्थाचे सौंदर्य वाढविण्यासाठी अथक परिश्रम घेत असताना पूजेसाठी रंगाचा वापर करून नावे लिहिणे चुकीचे असून प्रशासन निश्चित कारवाई करेल, असे त्यांनी म्हटले.
गोदाप्रेमी देवांग जानी यांनी अहिल्याबाई होळकर, बाजीराव पेशवा आणि गोपिकाबाई पेशवा यांनी हे घाट बांधले असून त्यांची नावे घाटाला नसताना बाहेरून आलेले लोक जागा कशी आरक्षित करू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला. घाटावरील रंग काढणे आणि नुकसान करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply