मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या अभिनयासोबतच नृत्यकौशल्यासाठीही ओळखली जाते. तिच्या नृत्याची अदाकारी आणि ऊर्जा चाहत्यांना नेहमीच आकर्षित करते. मात्र, यावेळी अमृता कोणत्याही चित्रपटातील डान्स किंवा रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आलेली नाही, तर तिने दिलेल्या एका परीक्षेमुळे ती चर्चेत आली आहे. अमृताने कथ्थक नृत्याची लेखी परीक्षा दिली आहे. विशेष म्हणजे, इतर विद्यार्थ्यांप्रमाणे वर्गात बाकावर बसून, हातात हॉलतिकीट आणि रोल नंबर घेऊन तिने हा पेपर सोडवला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्वतःचा अभिमान वाटणारा दिवस
अमृता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील खास क्षण, कामाचे अपडेट्स आणि वैयक्तिक अनुभव ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती इतर विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसून कथ्थकची लेखी परीक्षा देताना दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले की, हा तिच्यासाठी स्वतःचा अभिमान वाटणारा आणखी एक दिवस आहे. कथ्थकची लेखी परीक्षा देण्याचा हा प्रवास पूर्णपणे वैयक्तिक असून तिच्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. काही वर्षांपूर्वी तिने स्वतःला वचन दिले होते की, केवळ स्वतःच्या आनंदासाठी या मार्गावर चालायचे आहे. कोणतीही घाई नाही, कोणतीही अट नाही, फक्त एकेक पाऊल पुढे टाकत राहायचे आहे. खिडकीजवळच्या जागेवर बसून प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा अनुभव खूप छान होता, असेही तिने सांगितले. या प्रवासात साथ देणाऱ्यांचे तिने आभार मानले आहेत.
प्राजक्ता माळीची कमेंट चर्चेत
अमृताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र, अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कमेंटने विशेष लक्ष वेधले. प्राजक्ताने तिला लीगमध्ये स्वागत म्हणत पेपर कसा गेला, असे विचारले. यावर अमृतानेही मजेशीर उत्तर दिले की, पेपर मस्त गेला. दोघींच्या या संवादाला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
अभिनयासोबत कथ्थकचीही साधना
अमृताने याआधीही अनेकदा आपल्या नृत्यप्रेमाची झलक दाखवली आहे. २०२३ मध्ये तिने मुघल-ए-आझममधील मोहे पनघट पे या गाण्यावर कथ्थक सादर केले होते. आता लेखी परीक्षा देण्याच्या तिच्या निर्णयामुळे ती केवळ नृत्य सादर करण्यापुरती मर्यादित नसून त्याचा अभ्यासही मनापासून करत असल्याचे दिसत आहे. तिच्या या कृतीतून शिकण्याला वयाची मर्यादा नसते आणि स्वतःच्या आवडीसाठी कधीही नवीन सुरुवात करता येते, हा सुंदर संदेश मिळतो. तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Leave a Reply