ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. आलियाच्या जन्माआधीचा हा किस्सा ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले आहे. आलिया पोटात असताना सोनी यांनी एका दिवसात जवळपास १०० सिगारेट ओढल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी आपण गरोदर असल्याची त्यांना कल्पनाच नव्हती. एका चित्रपटातील धूम्रपानाच्या दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान हा प्रकार घडला होता.
गुमराहच्या चित्रीकरणादरम्यान घडला प्रकार
सोनी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या दोन्ही गरोदरपणादरम्यानच्या कामाच्या अनुभवांबद्दल सांगितले. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट दिग्दर्शित गुमराह या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दुसऱ्यांदा गरोदर होत्या. मात्र त्यावेळी त्यांना याची माहिती नव्हती. चित्रपटातील एका धूम्रपानाच्या दृश्यासाठी त्यांना वारंवार सिगारेट ओढावी लागली होती. त्या दिवशी आपण जवळपास १०० सिगारेट ओढल्या असतील, असे त्यांनी सांगितले. आपल्या पोटात आलिया असल्याची अजिबात कल्पना नव्हती. त्या मुळात सिगारेट ओढत नाहीत. मात्र त्या दिवसानंतर सिगारेटची तल्लफ जाणवू लागली होती, असेही त्यांनी सांगितले. त्याच चित्रपटातील फाशीच्या दृश्याचे चित्रीकरणही आलिया पोटात असतानाच त्यांनी केले होते. त्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणात जवळपास पाच महिन्यांचा खंड पडला. जेव्हा त्या पुन्हा सेटवर परतल्या, तेव्हा त्यांच्या शरीरातील बदल स्पष्टपणे दिसू लागले होते. पाच महिन्यांनंतर सेटवर परतल्यावर जुने कपडे त्यांना बसत नव्हते. पोट थोडे दिसू लागल्यामुळे निर्मात्यांना त्यांच्या कपड्यांमध्ये बदल करावे लागले.
पहिल्या गरोदरपणाचाही अनुभव
सोनी यांनी पहिल्यांदा आई होण्याचा अनुभवही सांगितला. १९८६ मध्ये प्रसारित झालेल्या बुनियाद या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्या पहिल्यांदा गरोदर झाल्या होत्या. त्यावेळी रमेश सिप्पी आणि ज्योती स्वरूप यांनी त्यांची विशेष काळजी घेतली होती. सकाळी लवकर चित्रीकरणाला जाण्यासाठी त्यांना गाडी उपलब्ध करून दिली जात होती. सेटवरही त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली होती. १९८८ मध्ये सोनी आणि महेश भट्ट यांच्या घरी पहिली मुलगी शाहीनचा जन्म झाला. त्यानंतर १९९३ मध्ये आलियाचा जन्म झाला. या मुलाखतीत सोनी यांनी पूर्वीच्या आणि आताच्या मनोरंजनविश्वातील बदलांवरही भाष्य केले. पूर्वी अभिनेत्री आई होणार असल्याची बातमी निर्मात्यांपासून लपवून ठेवावी लागत होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आलियाला आई असल्याचे लपवण्याची गरज नाही, याचा आपल्याला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply