एका गुन्ह्यातील संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जिल्हा कारागृहाकडे घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनला अचानक आग लागल्याची घटना कराड शहरात घडली. सुदैवाने या घटनेत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि संशयित आरोपी बालंबाल बचावले. शनिवारी रात्री सातच्या सुमारास कराडच्या भेदा चौकात ही घटना घडली. आगीच्या घटनेमुळे एकच हाहा:कार उडाला. व्हॅन जळून खाक झाली, मात्र या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, रेठरे (ता. कराड) येथील मारामारीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना कराड न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांना पोलीस व्हॅनमधून सातारा जिल्हा कारागृहात नेले जात होते. आरोपींना घेऊन जाणारी पोलीस व्हॅन कराड शहरातील भेदा चौक परिसरात आली असताना अचानक व्हॅनला आग लागली. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला भडकल्या.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अंमलदार शहाजी चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत व्हॅन तातडीने मोकळ्या जागेत उभी केली. व्हॅनमधील पोलीस कर्मचारी आणि आरोपींना त्वरित खाली उतरवले. त्यानंतर काही वेळातच आग भडकली आणि पोलीस व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, तोपर्यंत व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली होती.
जुन्या वाहनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पोलिसांच्या वाहनाला भरवस्तीत लागलेल्या या आगीमुळे कराड शहरातील नेहमी गजबज असणाऱ्या भेदा चौक परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस व्हॅनवरील चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी पोलीस खात्यातील जुन्या वाहनांचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. अनेकदा पोलीस वाहने रस्त्यातच बंद पडतात. त्यामुळे ती ढकलून सुरू करावी लागतात.
जुनी वाहने बंद पडणे, स्टार्टर न लागणे अशा समस्यांमुळे शासकीय खात्यातील जुन्या वाहनांचा प्रश्न यापूर्वीही ऐरणीवर आला होता. त्यामुळे शासनाने महसूल, पोलीस, कृषी, वन विभागांसाठी नवी वाहने खरेदी केली. मात्र, या खात्यातील काही जुनी वाहने अजूनही रस्त्यावर धावताना दिसत आहेत. त्यामुळे वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होणे, आग लागण्याच्या घटना घडत आहेत. कराडमध्ये झालेल्या घटनेनंतर सर्वच प्रशासकीय विभागांनी जुनी वाहने वापरणे बंद करणे आवश्यक असल्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply