जळगाव जिल्ह्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या रेल्वे यार्ड परिसरात कोळसा चोरी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा जवानांवर एका टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत चार जवान जखमी झाले असून, हल्लेखोरांनी शासकीय वाहनावर दगडफेक करून त्याच्या काचाही फोडल्या. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गस्तीदरम्यान चोरीचा डाव उधळला
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या परिसरात काही जण कोळसा चोरण्याच्या उद्देशाने आले होते. त्याच वेळी गस्तीवर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना हटकले आणि चोरी रोखण्याचा प्रयत्न केला. जवानांनी अडविल्याचा राग आल्याने संशयितांनी जवानांवर लाठ्या-काठ्या आणि दगडांनी हल्ला चढवला.
या हल्ल्यात जवान शुभम राजेंद्र धनगर यांना दुखापत झाली. भय्यासाहेब साहेबराव मोरे यांना मारहाण करण्यात आली, तर संतोष खौरतार यांच्या पाठीवर वार करण्यात आले. अमोल राठोड यांनाही मारहाण झाली. हल्ल्यानंतर जमावाने वाहनावर दगडफेक केली, त्यामुळे वाहनाच्या मागील बाजूच्या दोन्ही काचा फुटून मोठे नुकसान झाले.
अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जखमी जवान संतोष खौरतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, हल्ल्यात सहभागी असलेल्यांचा शोध घेतला जात आहे. विद्युत केंद्र परिसरातील कोळसा चोरीच्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Leave a Reply