पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नेतृत्वशैली आणि प्रशासकीय कामकाजाचा सखोल अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाने देशभरात पाच राष्ट्रीय कार्यशाळांची मालिका आखली आहे. नोव्हेंबर २०२६ पासून ऑक्टोबर २०२७ पर्यंत चालणाऱ्या या मालिकेत अडीच दशकांतील महत्त्वाचे निर्णय, त्यांची अंमलबजावणी आणि त्यातून मिळालेले परिणाम यांचा आढावा घेतला जाणार आहे.
पहिली कार्यशाळा दिल्लीत
या मालिकेतील पहिली कार्यशाळा मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील भारत मंडपम् येथे होणार आहे. ‘मिशन म्हणून नेतृत्व’ या संकल्पनेवर आधारित या कार्यशाळेत कच्छ भूकंपानंतरचे पुनर्वसन, कोविड-१९ महामारीचा सामना, ‘लखपती दीदी’ योजना आणि अवकाश क्षेत्राचे खासगीकरण व विस्तार या चार महत्त्वाच्या अनुभवांवर विशेष चर्चा होणार आहे. या निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आपले अनुभव सांगणार आहेत.
२५ वर्षांचा प्रशासकीय प्रवास
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १२ वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते. त्यानंतर मे २०१४ मध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधानपद स्वीकारले. सरकारचे प्रमुख म्हणून त्यांच्या कामकाजाला सात ऑक्टोबर रोजी २५ वर्षे पूर्ण झाली. भारतात लोकनियुक्त सरकारच्या प्रमुखपदी सलग सर्वाधिक काळ काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. या कार्यशाळांमध्ये त्यांच्या प्रशासकीय अनुभवांसह ‘प्रधानसेवक’ ही संकल्पना, अंत्योदय, जनभागीदारी आणि ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास, सब का प्रयास’ या तत्त्वांचा प्रशासनावर झालेला परिणाम तपासला जाणार आहे.
पाच विषय, सुमारे ९०० प्रतिनिधी
या मालिकेत पाच प्रमुख विषयांचा समावेश आहे. नोव्हेंबरमध्ये ‘मिशन म्हणून नेतृत्व’, जानेवारीमध्ये ‘अंमलबजावणी म्हणून प्रशासन’, एप्रिलमध्ये ‘समावेशकता म्हणून विकास’, जुलैमध्ये ‘संस्कृतीविषयक ओळख’ आणि सप्टेंबरमध्ये ‘जागतिक शक्ती म्हणून भारत’ या विषयांवर कार्यशाळा होणार आहेत. यावेळी ‘आयगॉट कर्मयोगी’ मंचावर ‘कर्मयोगी संकल्प’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार आहे. या कार्यशाळेस सुमारे ९०० प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांचे सचिव व वरिष्ठ अधिकारी तसेच आकांक्षी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी अशा सुमारे १५० प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
Leave a Reply