अलिबाग तालुक्यातील वरसोली गावात पाळीव जनावरांवर हल्ला करणाऱ्या वानराला वन विभागाने रविवारी सकाळी पकडले. गेल्या आठवड्यापासून या वानराने परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याच्या हल्ल्यात आठ दिवसांच्या वासराचा मृत्यू झाला असून, एक म्हैस आणि दोन वासरे जखमी झाली आहेत. या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गोठ्यात शिरून जनावरांवर हल्ला
वरसोलीतील बापदेव आळी परिसरात या वानराचा वावर होता. झाडांवर लपून बसल्यानंतर संधी मिळताच ते गोठ्यात शिरून बांधलेल्या जनावरांवर हल्ला करीत होते. जनावरांच्या तोंड आणि नाकाजवळ तसेच शरीराच्या अन्य भागांवर मोठे चावे घेतले जात होते. प्रशांत दत्तात्रेय वर्तक यांच्या म्हशीच्या अवघ्या आठ दिवसांच्या वासराचा या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा वानराने गोठ्यातील म्हशी आणि दोन वासरांवर हल्ला केला. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याला पकडण्याची मागणी केली होती. अखेर वन विभागाने प्रयत्न करून रविवारी त्याला ताब्यात घेतले.
जखमी जनावरांची प्रकृती चिंताजनक
हल्ल्यात जखमी झालेल्या जनावरांवर पशुसंवर्धन विभागामार्फत उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वानराच्या आक्रमक वर्तनामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. वानराला पकडण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जखमी जनावरांच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply