मत्स्य व्यवसायाला चालना देऊन मच्छीमारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू केली आहे. या योजनेतील २४ घटकांसाठी महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील पात्र मच्छीमार, मत्स्य शेतकरी आणि मत्स्य कास्तकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) जयेश बळकटे यांनी केले आहे.
योजनेचा उद्देश
राज्यातील जलस्रोतांचा शाश्वत वापर करून मत्स्यसंवर्धनाला प्रोत्साहन देणे आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित घटकांना आर्थिक बळ देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केवळ मत्स्योत्पादन वाढविण्यापुरती ही योजना मर्यादित नसून निर्यातमूल्य वाढविणे, मासेमारीनंतर होणारे नुकसान कमी करणे, मत्स्य आहाराचे प्रमाण वाढविणे आणि रोजगारनिर्मितीतून मच्छीमार कुटुंबांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणे यावर यात भर देण्यात आला आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या १९ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार ही योजना लागू झाली आहे. इच्छुकांनी शासनाच्या महाडीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत.
मार्गदर्शनासाठी सहाय्यता कक्ष
जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि लाभार्थ्यांना अर्जाची माहिती सहज मिळावी, यासाठी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) यांच्या कार्यालयात स्वतंत्र मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मार्गदर्शनासाठी जिल्हास्तरावर सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) जयेश बळकटे आणि सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमिता कोळेकर यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२५६२-२३४७२२ किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ८२७५४३२२५२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply