आज राज्यभरात छठपूजेचा उत्साह पाहायला मिळत आहे. उत्तर भारतीय नागरिकांचा पवित्र सण असलेल्या छठपूजेसाठी मुंबईसह नंदुरबार आणि ठाणे परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुहू चौपाटीवर भेट देत भाविकांना शुभेच्छा दिल्या.
डोंबिवलीत दुर्दैवी घटना
एकीकडे राज्यात छठपूजेचा उत्साह असतानाच डोंबिवलीत मात्र दुर्दैवी घटना घडली. डोंबिवलीच्या दावडी तलावात छठपूजेदरम्यान २२ वर्षीय जुगनू कश्यप बुडाला. कुटुंबासोबत तलावात उतरलेल्या जुगनूला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. होडीच्या मदतीने अडीच तासांपासून तरुणाचा शोध सुरू होता. आमदार राजेश मोरे यांनीही घटनास्थळी दाखल होत शोधमोहिमेचा आढावा घेतला.
राज्यभरात उत्साह
मुंबईच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघातही छठपूजेचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. शितल तलाव येथे मोठ्या संख्येने उत्तर भारतीय बांधव एकत्र आले आणि पारंपरिक पद्धतीने छठपूजा साजरी केली. यावेळी आमदार दिलीप लांडे उत्तर भारतीय पेहरावात उपस्थित होते. हिंदू धर्मातील परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दरवर्षी रामनवमी, कावड यात्रा आणि छठपूजा असे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातील, अशी प्रतिक्रिया आमदार दिलीप लांडे यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथेही छठपूजेचा उत्साह पाहायला मिळाला. तापी नदीच्या पवित्र तीरावर उत्तर भारतीय महिलांनी सूर्यदेव आणि छठी मैयाची विधिवत पूजा केली. नंदुरबार जिल्ह्यात उत्तर भारतीय नागरिकांची मोठी संख्या असल्याने प्रकाशा येथे या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.
मुंबईतील वरळीच्या जांभोरी मैदानातही महापर्व छठपूजा समिती, वरळी यांच्या वतीने सूर्य षष्ठी महायज्ञ आणि छठपूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सूर्यदेवाची पूजा केली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून छठपूजेत सहभाग घेतला. यावेळी छठपूजा समितीच्या वतीने महापौरांचे स्वागत करण्यात आले.
Leave a Reply