धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उसाला प्रतिटन चार हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम पहिली उचल म्हणून जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास सोमवारपासून (ता. १६) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येडशी टोलनाक्यावर बेमुदत रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
दोन-तीन महिन्यांपासून मागणी प्रलंबित
ऊसदराच्या प्रश्नावर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, निवेदने आणि विविध आंदोलने करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील साखर कारखानदारांची प्रत्यक्ष भेट घेऊनही दरवाढीची मागणी करण्यात आली होती. या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती; मात्र एकही कारखानदार उपस्थित न राहिल्याने ती बैठक निष्फळ ठरली. दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते, तरी अद्याप बैठक झाली नसल्याने प्रशासन आणि कारखानदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
कोल्हापूरच्या धर्तीवर दराची मागणी
कोल्हापूरच्या धर्तीवर जिल्ह्यातील कारखानदारांनी प्रतिटन चार हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पहिली उचल द्यावी आणि पंधरा दिवसांच्या आत ऊस बिल जमा करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, खरीप हंगामाचा शंभर टक्के पीकविमा द्यावा आणि २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांतील प्रलंबित विम्याचे वितरण करावे, अशीही मागणी आहे. जनावरांसाठी चारा छावण्यांऐवजी थेट शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. १३) जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply