हिवाळ्याच्या दिवसांत सकाळी आंघोळीसाठी गीझर सुरू केल्यानंतरही नळातून थंडच पाणी येत असेल, तर दिवसाची सुरुवातच बिघडते. अशा वेळी अनेक जण घाबरून लगेच मेकॅनिकला बोलावतात. मात्र, प्रत्येक वेळी गीझरमध्ये मोठा बिघाड झालेलाच असतो असे नाही. काही वेळा छोट्याशा कारणामुळे पाणी गरम होत नाही आणि घरीच चार सोप्या तांत्रिक गोष्टी तपासून ही समस्या ओळखता येते. त्यामुळे अनावश्यक खर्चही वाचतो.
थर्मोस्टॅट आणि थर्मल कट-आउट तपासा
गीझरमध्ये पाणी किती गरम व्हावे, हे थर्मोस्टॅट ठरवते. थर्मोस्टॅटचे तापमान कमी ठेवलेले असेल किंवा त्यात बिघाड झाला असेल, तर पाणी कोमटच राहते. त्यामुळे आधी थर्मोस्टॅट योग्य तापमानावर आहे का, हे पाहावे. त्याचबरोबर थर्मल कट-आउट हे सुरक्षेचे साधन आहे. पाणी गरजेपेक्षा जास्त गरम झाले, तर हे साधन वीजपुरवठा थांबवते. काही वेळा ते बंद पडल्यामुळे गीझर गरम होणे थांबते. त्यामुळे या दोन्ही भागांची तपासणी करणे महत्त्वाचे ठरते.
वीजपुरवठा आणि पाण्याचा प्रवाह पाहा
गीझरला वीज मिळत आहे का, हे तपासणेही तितकेच गरजेचे आहे. घरातील एमसीबी ट्रिप झाला असेल, तर गीझरला वीजपुरवठा होत नाही आणि पाणी गरम होत नाही. त्यामुळे एमसीबी चालू स्थितीत आहे का, हे पाहावे. शेवटी इनलेट व्हॉल्व्ह तपासावा. हा व्हॉल्व्ह गीझरमध्ये पाणी येण्याचा मार्ग नियंत्रित करतो. तो बंद असेल किंवा त्यात अडथळा असेल, तर पाण्याचा प्रवाहच थांबतो. या चारही गोष्टी व्यवस्थित असूनही पाणी गरम होत नसेल, तरच मेकॅनिकला बोलावणे योग्य ठरते. आधी या तपासण्या केल्यामुळे समस्या लवकर कळते आणि वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply