डहाणू तालुक्यातील वधना, पिंपळशेत आणि निकणे परिसरातील अनेक गावपाड्यांमध्ये जिओ मोबाईल नेटवर्कच्या समस्येने ग्राहक हैराण झाले आहेत. परिसरात मोबाईल टॉवर उभारण्यात आले असले, तरी अनेक पाड्यांपर्यंत नेटवर्क पोहोचत नसल्याने नागरिकांना संपर्क आणि इंटरनेट सेवेसाठी संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ५जी सेवेसाठी महागडे रिचार्ज करूनही इंटरनेट सुरळीत चालत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
वधना येथे जिओचा टॉवर उभारण्यात आला आहे, मात्र त्याचे नेटवर्क पिंपळशेत हद्दीतील अनेक गावपाड्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. थोडगापाडा, सुतारपाडा, गावठणपाडा तसेच निकणे परिसरातील घाटाळपाडा, मांजरमाळ, इभाडपाडा आणि दाभीपाडा येथे नेटवर्कची समस्या कायम आहे. काही ठिकाणी सिग्नल मिळत असले, तरी कॉलिंग आणि इंटरनेट सेवा वारंवार विस्कळित होत आहे.
पैसे मोजूनही सेवा नाही
ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेसाठी २९९ ते ३४९ रुपयांपर्यंत रिचार्ज करावा लागतो, मात्र पैसे मोजूनही अपेक्षित सेवा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप आहे. परिसरात अन्य मोबाईल कंपन्यांचे नेटवर्कही प्रभावी नसल्याने नागरिकांना नाइलाजाने जिओवर अवलंबून राहावे लागत आहे.
सध्या शासकीय योजनांचे अर्ज, विविध दाखले, ऑनलाइन आर्थिक व्यवहार आणि इतर प्रशासकीय कामांसाठी इंटरनेट आवश्यक झाले आहे, मात्र नेटवर्कअभावी नागरिकांची ही कामे रखडत आहेत. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणावरही परिणाम होत असून, महत्त्वाचे फोन करण्यासाठी नागरिकांना नेटवर्क मिळेल अशा ठिकाणी जावे लागते. त्यातच वीजपुरवठा खंडित होताच नेटवर्क पूर्णपणे बंद पडत असल्याने अडचणी अधिकच वाढत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधतानाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
ग्रामस्थांची मागणी
टॉवर उभारूनही नेटवर्कची सुविधा मिळत नसेल, तर या सुविधेचा उपयोग काय, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित कंपनीने नेटवर्कची क्षमता वाढवून दुर्गम गावपाड्यांपर्यंत सेवा उपलब्ध करावी. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही नेटवर्क सुरू राहण्यासाठी पुरेशी बॅटरी बॅकअप व्यवस्था करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
जिओ ग्राहक सुदान गृहे यांनी रिचार्जचे पैसे पूर्ण भरूनही नेटवर्क मिळत नसल्याचे सांगितले. ५जीचा रिचार्ज करूनही इंटरनेट व्यवस्थित चालत नाही. वीज गेली की नेटवर्कही गायब होते. कंपनीने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सेवा सुधारावी, अशी मागणी त्यांनी केली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply