बीड जिल्ह्यातील भाविकांना आता अयोध्येच्या रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी थेट बस सेवा उपलब्ध झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रासंगिक कराराअंतर्गत ही सेवा सुरू केली असून, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आता भाविकांना थेट अयोध्येला घेऊन जाणार आहे. त्यामुळे रेल्वेचे तिकीट वेळेवर न मिळणे, प्रवासातील गैरसोय आणि खासगी ट्रॅव्हल्सचे अवाढव्य दर यामुळे अयोध्येला जाण्याचा बेत रद्द करावा लागणाऱ्या अनेक रामभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीचे, म्हणजेच अयोध्येचे दर्शन घेण्याची बीड जिल्ह्यातील अनेक भाविकांची, विशेषतः ग्रामीण भागातील वारकरी आणि ज्येष्ठ नागरिकांची प्रबळ इच्छा असते. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले गेल्यानंतर ही ओढ अधिकच वाढली आहे. शेतीची कामे आटोपल्यानंतर अनेक जण तीर्थयात्रेचे नियोजन करतात. मात्र, प्रवासातील अडचणींमुळे अनेकांना ही यात्रा पुढे ढकलावी लागत होती. आता एसटीच्या या नव्या सुविधेमुळे ही अडचण कायमची दूर होणार आहे.
चाळीस भाविक एकत्र आल्यास बस आरक्षित करता येईल
एसटी महामंडळाच्या प्रासंगिक करार योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील कोणतीही संस्था, गणेश मंडळ, भजनी मंडळ, गृहनिर्माण संस्था किंवा गावातील भाविकांचा गट थेट अयोध्येसाठी वैयक्तिक बस आरक्षित करू शकतो. यासाठी एका बसमध्ये किमान ४० प्रवासी असणे ही प्रमुख अट घालण्यात आली आहे. ४० भाविक एकत्र आल्यास अयोध्येसह देशातील इतर धार्मिक स्थळांसाठीही एसटी आरक्षित करता येईल. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या प्रवासाचे संपूर्ण नियंत्रण आणि नियोजन पूर्णपणे प्रवाशांच्याच हातात असणार आहे. प्रवासात ठरवलेल्या थांब्यांवर बस थांबवणे, दर्शन किती वेळ घ्यायचे आणि दर्शन करून पुन्हा पुढील प्रवासाला कधी निघायचे, या सर्व सोयी या बुकिंगमध्ये मिळतात. या बुकिंगसाठी भाविक बीड जिल्ह्यातील कोणत्याही आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात किंवा एसटी महामंडळाच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन नोंदणी करू शकतात.
काशी आणि प्रयागराजचाही समावेश शक्य
बीडमधून अयोध्येला जाणारी ही एसटी केवळ एकाच शहरापुरती मर्यादित राहणार नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार अयोध्येसह परिसरातील आणि देशातील इतर प्रमुख धार्मिक स्थळांनाही भेटी देण्याची सोय यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर भाविकांना प्रवासादरम्यान वाराणसी (काशी), प्रयागराज येथील त्रिवेणी संगम आणि चित्रकूट यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांचेही दर्शन घ्यायचे असेल, तर तसा प्रवाशांच्या पसंतीनुसार मार्ग ठरवण्याची मुभा एसटीने दिली आहे. साधारणपणे महाराष्ट्रातून अयोध्या आणि परिसरातील तीर्थक्षेत्रे फिरून परत येण्यासाठी ७ ते ९ दिवसांची टूर लागते. यामध्ये प्रवासाचे दिवस आणि दर्शनाची वेळ यांचा अचूक मेळ साधला जातो.
एसटी महामंडळाच्या सुधारित दरांनुसार, जर प्रवाशांनी त्यांच्या बजेटनुसार साधी बस म्हणजेच लालपरी निवडली, तर त्यासाठी प्रती किलोमीटर ७५ रुपये भाडेदर आकारला जाईल. जर प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास हवा असेल, तर ते वातानुकूलित शिवशाही बसही निवडू शकतात, जिचा दर १२० रुपये प्रती किलोमीटर इतका असेल. याशिवाय निम-आराम बसचाही पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. या मूळ भाड्याव्यतिरिक्त, प्रवासातील टोल टॅक्स, इतर राज्यांची सीमा ओलांडताना लागणारा कर आणि पार्किंग शुल्क हे अतिरिक्त असणार आहे.
Leave a Reply