दिवाळीचा आनंद आणि भाऊबीजेचा सण साजरा केल्यानंतर माहेरहून सासरी परतण्याची लगबग महिलांमध्ये सुरू झाली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच संगमनेर बसस्थानकात महिलांसह प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक महिला आपल्या भावांना ओवाळण्यासाठी माहेरी गेल्या होत्या. सण साजरा झाल्यानंतर त्या पुन्हा सासरी परतण्यासाठी निघाल्या आहेत.
सकाळपासून बसस्थानकात गर्दी
बसस्थानकात दाखल होताच बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होती. फलाटांवर सामान घेऊन बसची वाट पाहणाऱ्या महिला आणि बस येताच जागा पकडण्यासाठी होणारी लगबग, असे चित्र दिवसभर दिसून आले. विशेषतः पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची अधिक गर्दी होती.
७१ बसगाड्यांची विशेष व्यवस्था
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन संगमनेर आगाराने विशेष व्यवस्था केली होती. ग्रामीण भागासह विविध लांब पल्ल्याच्या मार्गांवर जवळपास ७१ बसगाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, पंढरपूर तसेच मुंबई-बोरीवली या मार्गांवरील बसगाड्यांचा समावेश होता. आगारप्रमुख नीलेश बेंडकुळे यांनी ही माहिती दिली.
Leave a Reply