आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनात उभारल्या जाणाऱ्या साधुग्राममध्ये दहा लाख साधू-महंत आणि भाविकांसाठी चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी सुमारे १५५ कोटी रुपये खर्चून स्वतंत्र जलवाहिन्या आणि वितरण यंत्रणेचे जाळे उभे केले जाणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रयागराज येथील कुंभमेळ्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी दहा कोटींहून अधिक भाविक दाखल होतील, तर साधू-महंतांची संख्या दहा लाखांच्या वर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आखाडे आणि साधू-महंतांसाठी तपोवन व परिसरात एक हजार तीनशे ऐंशी एकर जागा घेतली जाणार आहे. यंदा तपोवन ते नांदूर गावापर्यंत आखाड्यांचा विस्तार केला जाणार आहे. तपोवनात कायमस्वरूपी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, तपोवनाव्यतिरिक्त नांदूरपर्यंतची जागा एका वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे.
दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून साधुग्रामसाठी स्वतंत्र जलवाहिन्या आणि वितरण यंत्रणा उभारली जाणार आहे. पर्वणीच्या काळात पाण्याचा तुटवडा भासू नये, याची काळजी घेतली जात आहे. दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाणार असून मुकणे धरणातून थेट जलवाहिनी आणली जाणार आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून निविदा प्रक्रिया सुरू आहे.
सांडपाणी व्यवस्थापनावरही १८८ कोटी
केवळ पाणीपुरवठाच नव्हे, तर सांडपाणी व्यवस्थापनासाठीही स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे. यासाठी सुमारे १८८ कोटी रुपयांची कामे हाती घेतली जाणार आहेत. लाखो भाविकांमुळे निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी मलनिस्सारण केंद्रासोबतच संपूर्ण साधुग्राममध्ये मलवाहिन्यांचे जाळे विकसित केले जाणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply