दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक नागरिक बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी जळगाव शहरात दोन ठिकाणी घरफोडी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. कुसुंबा आणि राजीव गांधीनगर येथे झालेल्या या घरफोड्यांमध्ये रोख रकमेसह दागिने आणि गॅस सिलिंडर असा एकूण ९१ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कुसुंब्यात ६९ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरीला
कुसुंबा येथील गोपीचंद धोंडू पाटील (वय ५१) हे खासगी नोकरी करतात. दिवाळीच्या सुटीनिमित्त ते मंगळवारी (ता. १०) कुटुंबीयांसह अमळनेर येथील मूळ गावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूने स्वयंपाकघराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील ५० हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन तोळ्यांचे कर्णफुले असा एकूण ६९ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, १२ नोव्हेंबरला शेजाऱ्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी तत्काळ पाटील यांना माहिती दिली. पाटील घरी येऊन पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजीव गांधीनगरात गॅस सिलिंडरसह चोरी
दुसरी घटना राजीव गांधीनगर येथे घडली. सुनीता प्रमोद मोरे (वय ४०) या बाहेरगावी गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी व कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील २० हजार रुपयांची रोकड आणि गॅस सिलिंडर असा एकूण २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी मोरे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply