परभणी शहरात रस्त्याने जाणाऱ्या महिलांचे गंठण आणि मंगळसूत्र हिसकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण आहे. सकाळ, दुपार किंवा सायंकाळ अशी कोणतीही वेळ चोरट्यांसाठी आड येत नसल्याचे चित्र आहे. शहरातील नागरी वसाहती असोत किंवा वर्दळीचे रस्ते, महिलांचे दागिने हिसकावून चोरटे सहज पसार होत असल्याने शहरवासीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सोन्याचे गंठण आणि मंगळसूत्र हे महिलांसाठी केवळ दागिने नसून भावनिक आणि आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचे असतात. मात्र शहरात रस्त्याने चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने सुरक्षित राहिलेले नाहीत, अशी भावना नागरिकांत निर्माण होत आहे. चोरट्यांकडून अचानक येऊन दागिने हिसकावले जात असल्याने महिलांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. गर्दीच्या ठिकाणीही अशा घटना घडत असतील, तर सामान्य महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी
शहरात अशा घटना वारंवार घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मात्र या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस आणि प्रभावी कारवाई होताना दिसत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. केवळ घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे सांगणे पुरेसे नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. महिलांचे दागिने लुटणाऱ्या टोळ्यांचा शोध घेणे, सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि संवेदनशील भागांत नियमित गस्त वाढवणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगितले जात आहे.
गस्त वाढवण्याची मागणी
शहरातील विविध भागांत पोलिसांची नियमित गस्त प्रभावीपणे सुरू आहे का, हा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. पोलिस प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांवर तातडीने कारवाई करावी आणि शहरात दरारा निर्माण करावा, अशी अपेक्षा परभणीकर व्यक्त करत आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply