जगाचे दुःख दूर करण्याचे कार्य म्हणजे माणुसकी आणि माणुसकीचा स्वाभाविक आविष्कार म्हणजे सेवा, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्व. माणिकलाल गांधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा विदर्भ गौरव पुरस्कार शुक्रवारी संयुक्त अरब अमिरात येथे वैद्यकीय सेवा प्रदान करणाऱ्या डॉ. संजय पैठणकर यांना डॉ. भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नागपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात समारंभाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रमुख अतिथी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराडचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा आदी उपस्थित होते.
सेवा हाच माणुसकीचा आविष्कार
डॉक्टर होण्यासाठी केवळ वैद्यकीय शिक्षण पुरेसे नाही, तर समाजाप्रती संवेदनशीलता आणि सेवाभावही महत्त्वाचा आहे, असे डॉ. भागवत म्हणाले. डॉक्टरांनी केवळ पोट भरण्यासाठी नव्हे, तर समाजाची सेवा करण्याच्या भावनेतून काम केले पाहिजे. डॉक्टर होण्यासाठी केलेली ही तपश्चर्या पुढे समाजसेवेतून सार्थ ठरली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या व्यासपीठावर उत्तुंग समाजसेवा करणारी व्यक्तित्वे आहेत, असे गौरवोद्गारही डॉ. भागवत यांनी काढले.
भारतीय डॉक्टरांमुळे जगात भारताची मान उंचावली असल्याचे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाने जगाला उत्तम डॉक्टर दिले असून त्यापैकी डॉ. संजय पैठणकर एक आहेत, असे सांगत डॉ. पैठणकरांसह नागपूर येथे मोठे कार्य उभे करण्याची इच्छा असल्याचे गडकरी पुढे बोलताना म्हणाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply