दिवाळीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. गुरुवारी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात लाल पोळ कांद्याच्या हंगामाला उत्साहात सुरुवात झाली. बाजार समितीचे सभापती तथा आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करून लाल पोळ कांद्याच्या खरेदी-विक्रीला प्रारंभ करण्यात आला.
पहिल्याच दिवशी उच्चांकी भाव
हंगामाच्या पहिल्याच दिवशी लाल पोळ कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बाजार समितीत कांद्याला किमान २,८०० रुपये, कमाल ५,२२२ रुपये, तर सरासरी ४,२०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. चांगल्या भावाने हंगामाची सुरुवात झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
रोखीने पेमेंट, शेतकऱ्यांना आवाहन
बाजार समितीत कार्यक्षेत्रासह परिसरातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असते. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत बाजार समितीत विक्रीस आलेल्या कांद्याचे पेमेंट रोखीने अदा केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेतकऱ्यांनी आपला लाल पोळ कांदा विक्रीसाठी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोपूळ रोड येथील मुख्य बाजार आवारात आणावा, असे आवाहन सभापती आमदार दिलीप बनकर, उपसभापती शिरीष गडाख, संचालक मंडळ व सचिव एस. डी. जाधव यांनी केले आहे. या वेळी संचालक सोहनलाल भंडारी, शंकरलाल ठक्कर, नारायण पोटे, अतुल शहा, सुरेश पारख, महावीर भंडारी, हितेश ठक्कर, अनुप थोरात, भरत ठक्कर, रवींद्र ठक्कर, अनिल जाधव, प्रकाश ठक्कर, चेतन बोरा, भाऊसाहेब पडोळ, केतन पुरकर, सुनील थोरात यांच्यासह खरेदीदार व व्यापारी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply