नाशिकच्या सातपूर परिसरात मंगळवारी रात्री लिफ्ट कोसळून एक महिला जखमी झाली. या घटनेची दखल घेत विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासणी केली. लिफ्टचा ब्रेक निकामी झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री सनशाइन अपार्टमेंटच्या गच्चीवर फटाक्यांमुळे आग लागली होती. भीतीपोटी अपार्टमेंटमधील रहिवासी लिफ्टमधून खाली येत असताना अचानक लिफ्ट कोसळली. त्यात एक महिला जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच विद्युत निरीक्षण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातग्रस्त लिफ्टची तपासणी करण्यात आली आणि रहिवाशांकडून माहिती घेण्यात आली.
मक्तेदार शहराबाहेर; परतल्यावर सखोल चौकशी
लिफ्टची देखभाल दुरुस्ती करणारा मक्तेदार शहराबाहेर असल्याने ते परतल्यानंतर सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाच्या अधिकारी राजश्री गीते यांनी सांगितले. मक्तेदाराची दुरुस्तीबाबत अधिक चौकशी करण्यात येणार असून, ते शहरात परतताच घटना घडण्याचे कारण काय आहे, याची माहिती घेतली जाणार आहे.
वर्षातून एकदा तपासणी बंधनकारक
वर्षातून एकदा तरी लिफ्टची विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून तपासणी करून देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. असे असताना बहुतांश अपार्टमेंट आणि सोसायट्यांचे सदस्य तसेच पदाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असतात. वर्षानुवर्षे देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. विभागाकडे ११ हजार ८८६ लिफ्टची नोंदणी आहे. त्यापैकी अनेक लिफ्टचा विनातपासणी वापर सुरू आहे.
गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून दरवर्षी लिफ्टची तपासणी करणे अनिवार्य आहे. लिफ्ट तपासणीचे शासकीय शुल्क अत्यल्प आहे. ३० मजली इमारतीपर्यंत केवळ सहाशे रुपये, तर त्यापेक्षा अधिक मजली इमारतीसाठी १ हजार ५०० रुपये शुल्क आकारले जाते. अशा घटना टाळण्यासाठी विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून तपासणी करण्यात आलेल्या आणि दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या अशा २० ते ३० गृहनिर्माण संस्थांना लिफ्ट दुरुस्ती करून घेण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. नियमित तपासणी केली जात असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply