लक्ष्मीकांत बेर्डे आणि विनोदी भूमिका हे समीकरण ठरलेले होते. विनोदाचा बादशाह म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी अत्यंत प्रसिद्ध होती. या जोडीने पन्नासच्यावर हिट सिनेमे दिले आहेत. पण लक्ष्या केवळ विनोदी अभिनेताच नव्हता, तर तो एक सशक्त अभिनेता होता. गंभीर भूमिकाही तो उत्तम प्रकारे वठवायचा. ‘एक होता विदूषक’ या सिनेमातून त्याने ते सिद्धही केले होते. पण इंडस्ट्रीने त्याला एकाच साच्यात बांधले. निदान ‘एक होता विदूषक’साठी तरी आपल्याला पुरस्कार मिळेल, अशी त्याला खंत होती. आयुष्यभर त्याच्या मनात ही सल राहिली होती. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी त्याच्या मनातील ही खंत बोलून दाखवली आहे.
एका मुलाखतीत उघड झालेली आठवण
वर्षा उसगांवकर यांनी एका डिजिटल प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्याच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी ‘एक होता विदूषक’ या सिनेमाचा किस्सा सांगतानाच लक्ष्याच्या मनातील घालमेलही बोलून दाखवली. लक्ष्य टॅलेंटेड होता. त्याच्यासोबत मी ‘एक होता विदूषक’ हा सिनेमा केला होता. त्याच्या आधी लक्ष्याची इमेज कॉमेडी, कॉमेडी अशी होती. पण लक्ष्याला एक खंत होतीच. माझा एक वेगळा पैलू लोकांना दिसला पाहिजे, असे वर्षा उसगांवकर म्हणाल्या.
सिनेमा अप्रतिम होता, पण…
डॉ. जब्बार पटेल यांनी ‘एक होता विदूषक’ लक्ष्याला ऑफर केला होता. पुलं देशपांडे यांनी या सिनेमाचे संवाद लिहिले होते. एनएफडीसीने हा सिनेमा प्रोड्यूस केला होता. अतिशय सुंदर असा हा सिनेमा होता, पण तो एवढा चालला नाही, असे वर्षा उसगांवकर यांनी सांगितले. या सिनेमाच्या वेळी लक्ष्याचा त्यांना फोन आला होता. तो म्हणाला, वर्षा तुला हा सिनेमा करायचा आहे. तुला नेहमी हिरोईन ओरिएंटेड रोल हवे असतात. हा सिनेमा हिरोईन ओरिएंटेड नाहीये. हा हिरो ओरिएंटेड सिनेमा आहे. या सिनेमात विदूषकाचा रोल महत्त्वाचा आहे. तो रोल मी करतोय. पण त्यात तू मला हवी आहेस. तिथे पैशाचा विचार करू नकोस. पैसे कमी मिळतील. एनएफडीसी तुला जास्त पैसे देणार नाही. पण तो सिनेमा माझ्यासाठी कर, असे त्याने त्यांना निक्षून सांगितले.
पुरस्कार मिळायला हवा होता
त्यानंतर डॉक्टर जब्बार पटेल त्यांच्याकडे आले. त्यांनी त्यांना कथा ऐकवली. तो सिनेमा त्यांना खरंच आवडला. मग पैशाची बोलणी झाली. त्यांनी जे काही आहे ते त्यांना ऑफर केले. पण खरंच त्यांनी पैशांचा विचार केला नाही. लक्ष्याच्या एका शब्दावर त्या सिनेमात काम करण्यासाठी तयार झाल्या आणि शिवाय त्यांना तो रोलही आवडला होता. या सिनेमातून लक्ष्याचा एक वेगळा पैलू दिसेल, असे त्यांना वाटले होते. लक्ष्या या सिनेमात खूप इंटरेस्ट घेत होता. प्रत्येक फ्रेम बाय फ्रेम तिकडे तो हजर असायचा. आपले सीन नसले तरी तो तिथे हजर असायचा. त्यामुळे त्यांना खूप टचिंग वाटले. त्याने या सिनेमात ज्या पद्धतीने काम केले, त्यात वेगळा लक्ष्या त्यांना दिसला. त्यांनाच नाही, प्रेक्षकांनाही दिसायला हवा होता. त्यांना असे वाटते की हा त्याचा अॅवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स होता. त्या वर्षीचा पुरस्कार त्याला मिळाला नाही. त्याला खूप वाईट वाटले. त्याला खंत वाटली. या सिनेमासाठी मला पुरस्कार मिळायला हवा होता, असे त्याला वाटत होते. त्यांनाही तेच वाटते, तो पुरस्कार त्याला मिळायला हवा होता. तो मिळाला असता तर त्याला एक वेगळा पैलू मिळाला असता, असेही त्या म्हणाल्या.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply