लता मंगेशकर यांच्या गाण्यांचं गारुड भारतीय मनावर कायम राहणार आहे. लता दीदींनी गायलेली प्रत्येक गाणी रसिकांच्या कायम ओठांवर असतात. साक्षात सरस्वती माता त्यांच्या वाणीत आहे, असं म्हटलं जातं. लता दीदींनी कायम आपला आब राखतच गाणी स्वीकारली होती. मात्र, एकदा त्यांच्याकडे एका आयकॉनिक कॅब्रे गाण्याची ऑफर आली होती. १९६९ मध्ये आलेल्या ‘इंतकाम’ चित्रपटासाठी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी त्यांना कॅब्रे गीत गाण्याचा आग्रह धरला होता.
त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत कॅब्रे गाणी गाणं म्हणजे तुलनेने कमीपणाचं मानलं जायचं. आशा भोसले आणि गीता दत्त यांनी अनेक कॅब्रे गीतं गाऊन या गीतांनाही प्रसिद्धी मिळवून दिली होती. मात्र, लता दीदींच्या वाट्याला मोजकीच कॅब्रे गाणी आली. लता दीदी या सर्वसाधारणपणे शास्त्रीय बाज असलेली गाणी गाण्यास प्राधान्य द्यायच्या. त्यामुळे कॅब्रे गीताची ऑफर आल्यावर त्यांनी आधी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी खूपच आग्रह धरला आणि अखेर लता दीदी तयार झाल्या. मात्र, त्यांनी दोन अटी घातल्या.
लता दीदींच्या दोन अटी कोणत्या होत्या?
पहिली अट होती, या गाण्यात कोणताही वल्गर शब्द नसावा. दुसरी अट होती, हे गाणं पडद्यावर चांगल्या कलाकारावर चित्रीत केलं जावं. या अटी पाळण्यास लक्ष्मीकांत-प्यारेलाल तयार झाले.
‘आ जाने जा’ ने रचला नवा इतिहास
‘आ जाने जा’ हे गाणं १९६९ मध्ये आलेल्या ‘इंतकाम’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटासाठी सिच्युएशन एका पार्टीतील गीताची होती. लता दीदींच्या आवाजात हे कॅब्रे गाणं तयार झालं. या गाण्यात लता दीदींनी आर्तता आणि मादकता यांचा संगम करत या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. अभिनेत्री हेलन यांच्यावर चित्रीत केलेल्या या गाण्याने नवा इतिहास रचला. या गीताचे शब्द गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहिले होते. संथ सुरुवात आणि मादक लयीत सुरू होणारं हे गाणं आजही बॉलिवूडमधील सर्वोत्त्कृष्ट कॅब्रे गाण्यांपैकी एक मानलं जातं.
लता दीदींनी आपल्या कारकीर्दीत मोजकीच कॅब्रे गाणी किंवा क्लब साँग गायली आहेत. ‘आ जाने जा’ (चित्रपट: इंतकाम – १९६९, संगीतकार: लक्ष्मीकांत-प्यारेलाल), ‘बंगले के पीछे’ (चित्रपट: समाधी – १९७२, संगीतकार: आर. डी. बर्मन), ‘गम छोडके मनाओ रंग’ (चित्रपट: गुमनाम – १९६५, संगीतकार: शंकर-जयकिशन) आणि ‘मेरा नाम है जमीला’ (चित्रपट: नाईट इन लंडन – १९६७, संगीतकार: लक्ष्मीकांत-प्यारेलाल) ही त्यांची प्रसिद्ध कॅब्रे गाणी आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply