दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याच महायुती सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. अजित पवार यांचे देवगिरी निवासस्थानावरील सीसीटीव्ही फुटेज शोधू न शकणारं सरकार निरुपयोगी असल्याची टीका त्यांनी केली आहे.
माजी आमदार मिटकरी यांनी आपल्या म्हैसपूर येथील शेतात आयोजित बळी महोत्सव कार्यक्रमात शेतकऱ्यांसमोर बोलताना हे वक्तव्य केले. अजितदादांचे मित्र म्हणवून घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मृत्यूच्या नऊ महिन्यानंतरही प्रकरणाची सीबीआय चौकशी का करत नाहीत, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
विमान प्रवासाचा सल्ला देणारे कोण?
मृत्यूच्या आदल्या दिवशी रस्ते मार्गाने जाण्याचे निश्चित झाल्यानंतर अजित पवारांना तो निर्णय ऐनवेळी बदलायला लावणारे कोण आहेत, असा सवाल मिटकरी यांनी केला. ऐनवेळी विमान प्रवासाचा सल्ला देणारे कोण आहेत आणि विमान प्रवासातील पायलट व क्रू मेंबर्स बदलवणारे कोण आहेत, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. अजित पवारांचा घात झाल्याच्या आरोपाचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला.
चित्रपटाच्या दिग्दर्शकांना पुरावे दिल्याचा दावा
येणाऱ्या महाराष्ट्र एपस्टीन फाईल चित्रपटाच्या दिग्दर्शकांना आपण अजित पवारांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर अघोरी पूजा करणाऱ्यांसंदर्भात आपल्याकडे असलेले पुरावे दिल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. खरात यांच्या आश्रमात करंगळ्या कापणारे कोण होते, याचा शोध घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
अजित पवार यांचा अपघाती मृत्यू होऊन नऊ महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. अद्याप म्हणावा तसा तपास झाला नसल्याचे मिटकरी म्हणाले. मिटकरी यांनी आपल्याच सरकारवर केलेल्या या कठोर टीकेनंतर राज्यातील महायुतीच्या घटक पक्षांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply