अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास हिच्यावर, लॉस एंजेलिसमध्ये कुटुंबासोबत दिवाळी साजरी केल्यानंतर सोशल मीडियावर टीका होत आहे. अभिनेत्रीने दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने पारंपरिक भारतीय पेहराव परिधान केला आहे, घराची सजावट केली आहे आणि ती कुटुंबासोबत वेळ घालवल्याचे दिसून येते. मात्र, या फोटोंमधील एका खाद्यपदार्थावरून आणि मेणबत्तीवरून ऑनलाइन वाद निर्माण झाला आहे.
## प्लेटमधील पदार्थ आणि मेणबत्तीवरून वाद
प्रियांका चोप्राने लॉस एंजेलिसमधील आपल्या घरी पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी हिच्यासोबत दिवाळी साजरी केली. तिने या प्रसंगाचे काही फोटो शेअर केले, ज्यात ती पारंपरिक भारतीय वेशभूषेत दिसत आहे, तसेच दिवाळीची सजावट आणि खाद्यपदार्थांची झलकही पाहायला मिळते. तिचा पारंपरिक भारतीय लूक सुरुवातीला अनेकांना आवडला, परंतु एका फोटोत तिच्या प्लेटमध्ये तळलेल्या कोळंबीसारखा पदार्थ दिसत होता. तो पाहून सोशल मीडिया युझर्सनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. काहींनी दिवाळीच्या दिवशी मांसाहारी पदार्थ खाण्यावर प्रश्न उपस्थित केले आणि सणाशी संबंधित पारंपरिक आहारविषयक प्रथांचा उल्लेख केला.
याव्यतिरिक्त, काही युझर्सनी अभिनेत्रीच्या जुन्या विधानांची आठवण करून दिली, ज्यात तिने लोकांना दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. यावर टोमणा मारत काहींनी विचारले की, फटाक्यांमुळे होणाऱ्या अस्थमा संबंधी तिची चिंता केवळ दिवाळीच्या वेळीच का समोर येते? एका युझरने कमेंट केली, दिवाळीच्या दिवशी मांसाहारी अन्न? तर दुसऱ्याने विचारले, दिवाळीच्या दिवशी कोणी मांसाहार कसे खाऊ शकते? आणि मेणबत्ती का, पारंपरिक दिवे का नाहीत? फोटोंमध्ये दिसणारे खाद्यपदार्थ आणि मेणबत्तीवरून लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
## परदेशातही भारतीय सण जपते
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार म्हणून उदयास आली आहे. लग्नानंतर तिने बॉलिवूडमधला वावर कमी केला असला तरी हॉलिवूडमध्ये मात्र तिने चांगलाच जम बसवला आहे. याशिवाय ती लग्नानंतर आता लॉस एंजेलिस येथे राहते. वरच्या वर कामा निमित्त किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी ती भारतात येत असते. पण परदेशात राहून ती बरेचदा भारतीय सणवार आनंदाने साजरे करताना दिसते. परदेशात राहत असूनही, प्रियांका चोप्राने भारतीय प्रथा आणि सण आपल्या कौटुंबिक जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून जपण्यावर नेहमीच भर दिला आहे. ती पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी यांच्यासोबत भारतीय सण उत्साहात साजरी करते. दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने आपल्या पारंपरिक पेहरावातून आणि सजावटीतून भारतीय संस्कृतीची झलक दाखवली.
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास प्रियांका चोप्रा दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या आगामी भव्य बजेटच्या वाराणसी या चित्रपटाद्वारे भारतीय सिनेइंडस्ट्रीत पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात ती मंदाकिनीची भूमिका साकारणार असून, यात ॲक्शन सीक्वेन्स, टाइम ट्रॅव्हल आणि एक विशेष डान्स नंबर पाहायला मिळणार आहे. महेश बाबू रुद्रच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर पृथ्वीराज सुकुमारन खलनायक कुंभची भूमिका साकारणार आहेत. या कथेचा विस्तार अंटार्क्टिका, आफ्रिका आणि वाराणसीसह विविध ठिकाणांवर आणि कालखंडांवर पसरलेला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply