दिवाळीच्या दिवशी, रविवारी रात्री फटाक्यांचा धूर आसमंतात पसरल्याने दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील हवा सोमवारी प्रचंड विषारी झाली. गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक प्रदूषित दिवाळीची नोंद यंदा झाली. अनेक भागांतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या अतिधोकादायक टप्प्याच्या पुढे गेल्याने श्वास घेण्यास त्रास होणे, डोळे जळजळणे यांसारख्या समस्या पुन्हा समोर आल्या आहेत. दिवाळीनिमित्त दिल्लीकरांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडल्याने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील अनेक शहरांवर धूर व धुरक्याची दाट चादर पसरली. त्यामुळे दिल्लीत दृश्यमानता अत्यंत कमी झाली.
## कोणत्या भागात किती निर्देशांक?
दिल्लीत सोमवारी सरासरी हवाई गुणवत्ता निर्देशांक ३७६ इतका नोंदवण्यात आला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील पटपडगंज येथील निर्देशांक ४१८, आयटीओ भागात ४०६, राजीव चौकात ३८१, तर साऊथ एक्स्टेंशन परिसरात ३६० इतका नोंदवण्यात आला. प्रदूषणाची ही समस्या दिल्लीपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. नोएडा, फरीदाबाद, पलवल, इंदिरापूरम, गाझियाबादच नव्हे तर उत्तर प्रदेशातील कानपूर आणि वाराणसीसह किमान दहा शहरांमधील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली. दिवाळीनंतर दिल्लीत पसरलेला दाट धूर कमी करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कर्तव्य पथावर सोमवारी पाण्याचे फवारे मारण्यात आले.
## केवळ फटाकेच जबाबदार का?
दिल्लीत दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या काळातच प्रदूषणाची पातळी वाढण्यामागे शेजारील राज्यांमधील पराली जाळण्याची समस्या हे एक महत्त्वाचे कारण असल्याचा दावा केला जातो. परंतु, प्रदूषणाचा प्रश्न मात्र केवळ फटाके किंवा पराली जाळण्यापुरता मर्यादित नसून, वाहनांचा धूर, बांधकामांमधून उडणारी धूळ, औद्योगिक उत्सर्जन आणि हवामानातील बदल या घटकांचाही दिल्लीच्या हवेवर परिणाम होतो. त्यामुळे एका घटकाला दोष देऊन दुसऱ्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी प्रदूषणाच्या सर्व स्रोतांवर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
दिल्लीतील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने प्रदूषणासाठी केवळ दिवाळीच्या फटाक्यांनाच जबाबदार धरण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संघटनेचे अध्यक्ष बृजेश गोयल यांनी प्रदूषणाला आपला विरोध असल्याचे स्पष्ट करतानाच एका दिवसाच्या फटाक्यांमुळेच दिल्लीची हवा खराब झाली, असे म्हणणे सर्वस्वी योग्य नसल्याचे म्हटले आहे. दिवाळीपूर्वी ५, ६ आणि ७ नोव्हेंबर रोजीही दिल्लीतील निर्देशांक ३५० ते ४०० दरम्यान होता. त्यावेळी फटाके फोडले गेले नव्हते. मग त्या प्रदूषणाला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी केला.
दिल्लीतील प्रदूषणावरून भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी पंजाबच्या शेतांमधील काडीकचरा मुद्दाम जाळून आपकडूनच प्रदूषण वाढवले जात असल्याचा आरोप केला. तर काँग्रेस आणि आपने भाजप सरकारवर नियम प्रभावीपणे लागू न केल्याचा, तसेच निर्देशांकाची आकडेवारी लपविल्याचा आरोप केला आहे. पंजाबमध्ये एका दिवसात भातपिकांच्या परांती जाळण्याच्या सर्वाधिक १,१५२ घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे या हंगामात राज्यात परांती जाळण्याच्या एकूण घटना ३,३०७ वरून ४,४५९ झाल्या. गेल्या वर्षी दिवाळीच्या दिवशी शेतातील आगीच्या ४५ घटनांची नोंद झाली होती. भातपिकांचे अवशेष जाळण्याच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करूनही त्यात अपयश आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply