कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्यातील एक छोटी चूकही अनेकदा मोठी अडचण ठरते. नावातील चूक किंवा जन्मतारखेतील बदलामुळे पीएफचा पैसा काढताना अडथळा येतो. पेन्शनचा दावा करतानाही काम रखडतं. त्यामुळे वेळेवर पैसे मिळणं अवघड होतं. ही अडचण दूर करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कर्मचाऱ्यांना ऑनलाइन दुरुस्तीची सोय दिली आहे.
जॉइंट डिक्लेरेशनची सुविधा काय आहे?
ईपीएफओने आपल्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरून या सुविधेची माहिती दिली आहे. ऑनलाइन जॉइंट डिक्लेरेशनच्या माध्यमातून पात्र सदस्य घरबसल्या आपल्या पीएफ खात्यातील वैयक्तिक माहिती आणि नोकरीशी संबंधित तपशील दुरुस्त करू शकतात. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही आणि ईपीएफओ कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत नाहीत.
नाव, जन्मतारीख किंवा नोकरीची माहिती चुकीची असल्यास ही सुविधा उपयोगी ठरते. माहिती वेळेत दुरुस्त केल्यास भविष्यात पीएफ काढताना किंवा पेन्शनचा दावा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळता येतात. त्यामुळे खात्यातील तपशील अचूक ठेवणं प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाचं आहे.
दुरुस्ती का महत्त्वाची?
पीएफचा पैसा काढायचा असो किंवा पेन्शनचा लाभ घ्यायचा असो, खात्यातील माहिती आणि कागदपत्रांतील माहिती जुळणं आवश्यक असतं. माहितीत तफावत असल्यास दावा रखडतो आणि पैसे मिळण्यास विलंब होतो. ऑनलाइन सुविधेमुळे ही दुरुस्ती आता घरबसल्या करता येते, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ आणि धावपळ दोन्ही वाचतात.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply