गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला लागू नका, अन्यथा एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू, असा इशारा पाटील यांनी सतेज पाटील यांना दिला.
तेल लावलेला पैलवान
देवेंद्र फडणवीस हे कुस्तीच्या आखाड्यात तेल लावून उतरलेले पैलवान असून ते एकदा वटारले तर संपूर्ण साम्राज्य एका दिवसात धुळीस मिळेल, अशा शब्दांत पाटील यांनी इशारा दिला. मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये जाण्याऐवजी राहुल गांधींकडे परवानगी मागण्यासाठी जा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
१५ दिवसांपासून बालिश वागणूक
मागील पंधरा दिवसांपासून कोल्हापुरात जे सुरू आहे, ते सर्वजण पाहत आहेत, असे पाटील म्हणाले. लहान मुलाला एखादे खेळणे मिळाले नाही की ते जसा त्रागा करते, अगदी तसाच प्रकार सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे होते. या बालिश वागणुकीमुळेच लोकांनी ओळखले आहे की हे ‘बंटी’ आहेत, ‘बंटी साहेब’ नाहीत, असे पाटील म्हणाले. राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे असेल तर माणूस समजदार असावा लागतो. केवळ स्वतःची टिमकी वाजवून मुख्यमंत्री होता येत नाही, असेही त्यांनी म्हटले.
महायुती एकत्र, आघाडीत एकटे बंटी पाटील?
सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीला बदनाम करण्याचा सतत प्रयत्न केला गेला, असे पाटील म्हणाले. पण आज महायुती म्हणून सर्व पक्ष एकत्र ठामपणे उभे आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत बंटी पाटील सोडून त्यांच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठेच दिसली नाही, असा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधींना कोल्हापूरबद्दल काय माहिती आहे, असा सवालही त्यांनी केला. गोकुळचे नाव जगात २१२ ठिकाणी पोहोचले आहे आणि ते चांगल्या कामामुळे पोहोचले आहे, असेही ते म्हणाले.
डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवर सवाल
डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवर पाटील यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. एकेकाळी डी. वाय. पाटील हे स्कूटरवरून फिरत होते. आज एवढी अफाट संपत्ती कुठून आली, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे पाटील म्हणाले. हे सर्व स्वतःसाठी मलाई काढण्याचे काम चालले असल्याचा आरोप त्यांनी केला. तुम्ही स्वतः काचेच्या घरात राहता, त्यामुळे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारणे थांबवा, असे ते म्हणाले. आपली उंची पाहून बोला, आम्हाला डिवचले तर आम्ही सोडणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
सोनिया गांधींच्या फोनचा दावा
जनादेश पायदळी तुडवून जेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले गेले, तेव्हा सोनिया गांधींशी एक कॉल झाला होता, असे पाटील म्हणाले. त्या कॉलवर बंटी पाटलांनी सोनिया गांधींना कसा दम दिला होता, हे मला सर्व माहिती आहे, असा दावा त्यांनी केला. त्याचे कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचेही पाटील म्हणाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply