बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नदीत मिसळणारे रासायनिक सांडपाणी, साचणारा कचरा आणि गेल्या दोन दिवसांत मृतावस्थेत आढळलेले मासे यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर उल्हास नदी बचाव समितीने ‘एक सही… संतापाची’ ही जनआक्रोश मोहीम हाती घेतली आहे. स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांचा संताप आणि नदी संवर्धनाची मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा समितीचा प्रयत्न आहे.
मासे मृतावस्थेत आढळल्याने चिंता वाढली
नदीत सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी आणि कचरा यामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढला आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून नदीपात्रात मासे मृतावस्थेत आढळल्याने नदीतील जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रदूषणाचा परिणाम नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेवरही होत आहे, अशी चिंता पर्यावरणप्रेमी आणि नागरिक व्यक्त करत आहेत.
समितीच्या मते, नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केवळ तक्रारी आणि निवेदने देऊन उपयोग होणार नाही. नागरिकांचा व्यापक सहभाग आणि प्रशासनावर जनदबाव निर्माण होणे आवश्यक आहे. नदीचे प्रदूषण थांबवावे, नदीपात्राचे संरक्षण करावे आणि प्रभावी संवर्धन उपाययोजना राबवाव्यात, या मागण्यांना नागरिकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला जाणार आहे.
१२ आणि १३ नोव्हेंबरला स्वाक्षरी मोहीम
ही मोहीम १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत बदलापूर पश्चिम येथील बाजारपेठ परिसरात, पोलिस चौकीसमोर होणार आहे. नदीचे प्रदूषण हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून नागरिकांचे आरोग्य, भविष्यातील जलसुरक्षा आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याशी निगडित विषय आहे. त्यामुळे बदलापूरकरांसह परिसरातील नागरिकांनी मोहिमेत सहभागी होऊन नदीच्या संरक्षणासाठी आपली सही नोंदवावी, असे आवाहन उल्हास नदी बचाव समितीने केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply