दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झालेली प्रचंड गर्दी आणि वाढलेल्या व्यावसायिक उलाढालीमुळे उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. सणानंतर निर्माण झालेल्या या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल ४७० मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. त्यामुळे कचऱ्याने व्यापलेल्या प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यांनी पुन्हा स्वच्छतेचा श्वास घेतला.
बाजारपेठांमध्ये कचऱ्याचे ढीग
दिवाळीच्या काळात शहाड स्टेशन मार्केट रोड, एक नंबर भाजी मार्केट, गजानन मार्केट, टिळक मार्केट, जपानी मार्केट, फर्निचर मार्केट, शिरू चौक, गोल मैदान, नेहरू चौक, चार नंबर मेन बाजार, गाऊन मार्केट, लालचक्की तसेच दुधनाका ते कैलास कॉलनी या परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे बाजारपेठांमधील वर्दळ वाढली होती. परिणामी दुकाने, रस्ते आणि पदपथांवर कचऱ्याचे ढीग साचले होते. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली होती.
यंत्रणा आणि मनुष्यबळ तैनात
ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या निर्देशानुसार विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण आणि आरोग्य उपायुक्त डॉ. दीपाली चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने यंत्रणा कामाला लावली. कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी चार जेसीबी, १३ डम्पर, १८ कॉम्पॅक्टर, नऊ टिप्पर, ८६ घंटागाड्या आणि चार पॉवर स्वीपिंग मशीन तैनात करण्यात आल्या होत्या. सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाजारपेठा आणि प्रमुख रस्त्यांवरील कचरा हटविण्यात आला.
नियोजनबद्ध पद्धतीने राबविलेल्या या मोहिमेत ४७० मेट्रिक टन कचऱ्याची उचल करण्यात आल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार यांनी दिली. दरम्यान, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर किंवा उघड्यावर कचरा टाकू नये. कचरा घंटागाड्यांमध्येच टाकून महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply