धाराशिव जिल्ह्यात सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. ठिकठिकाणी ऊस तोडणीच्या कामांनी वेग घेतला असून, भीषण चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा हंगाम शेतकरी आणि पशुपालकांसाठी मोठा दिलासा ठरू लागला आहे.
हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या भुकेचा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या उसाच्या वाढ्याला मोठी मागणी वाढली आहे. पशुपालक थेट शेतात जाऊन किंवा घरपोच वाढे खरेदी करत आहेत.
गळीत हंगामामुळे चाऱ्याची सोय
यंदा जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. आगामी जानेवारीअखेरपर्यंत म्हणजेच पुढील साधारण तीन महिने हा हंगाम चालण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तोपर्यंत पशुपालकांना हिरवा चारा म्हणून उसाच्या वाढ्याचा पुरवठा होत राहणार आहे.
वाढ्याचे दर आणि साठवणूक
उसाच्या वाढ्याला सध्या मोठी मागणी असल्याने दरातही तेजी पाहायला मिळत आहे. ऊसतोडणीच्या ठिकाणी थेट शेतात जाऊन खरेदी केल्यास वाढ्याच्या पेंडीला प्रतिशेकडा ४०० ते ५०० रुपये दर द्यावा लागत आहे. स्वतः वाहतूक करण्याचा त्रास वाचविण्यासाठी थेट गोठ्यापर्यंत वाढे हवे असल्यास प्रतिशेकडा ९०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत.
असे असले तरी भविष्यात पावसाळ्यापर्यंत जनावरांच्या चाऱ्याची सोय व्हावी यासाठी पशुपालक वाढे खरेदी करून त्याची गंजी लावून साठवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. कळंब तालुक्यातील शिराढोण येथील एका शेतकऱ्याने ऊसतोड झाल्यानंतर जनावरांच्या चाऱ्यासाठी वाढ्याची गंजी लावून साठवणूक केली असून, स्वतःच्याच जनावरांना चाऱ्याची अत्यंत गरज असल्याने त्याने वाढ्याची विक्री केली नाही.
उसाचे वाढे सध्या दुष्काळी स्थितीत जनावरांसाठी मोठा आधार ठरत आहेत. पुढील तीन महिने गळीत हंगाम सुरू राहणार असल्याने पशुपालकांना हिरवा चारा सहज उपलब्ध होत राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply