पिंपळगाव बसवंत येथील स्मशानभूमीत दिवाळीचा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. स्मशानभूमीबद्दल मनात असलेली भीती आणि अंधश्रद्धा दूर करण्याच्या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून येथे दिवाळीत रोषणाई आणि रांगोळीची परंपरा सुरू आहे.
दीपावलीनिमित्त वसुबारसपासून स्मशानभूमीत आकाशकंदील, विविध रंगांच्या आकर्षक रांगोळ्या आणि रंगीत दिव्यांची रोषणाई केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघतो.
दहा वर्षांपासूनची परंपरा
जुन्या काळापासून स्मशानभूमीबद्दल मनात भीती आणि अंधश्रद्धा रुजल्या आहेत. मात्र विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक गोष्टींची उत्तरे मिळू लागली आहेत. त्याच जाणिवेतून पिंपळगाव बसवंतचे नागरिक गेल्या दहा वर्षांपासून दिवाळीच्या काळात स्मशानभूमी रंगीत दिवे आणि रांगोळीने सजवत आहेत. सुरुवातीला ग्रामपंचायतीची, तर सध्या नगर परिषदेची परवानगी घेऊन हा उपक्रम राबवला जातो.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निफाड रोडवरील पिंपळगाव बसवंत-बेहेड फाट्याजवळ पाराशरी नदीकाठावरील स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात येते. त्यानंतर विद्युत रोषणाईसह आकाशकंदील लावून स्मशानभूमी सुशोभित केली जाते. येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार यासाठी पुढाकार घेतात.
भीती आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा उद्देश
स्मशानभूमीविषयी माणसांच्या मनातील भीती आणि अंधश्रद्धा दूर व्हावी, विज्ञान युगात जगताना पूर्वग्रह आणि अंधश्रद्धा नाहीशी व्हावी, या जाणिवेतून गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवत असल्याचे राजेंद्र पवार यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply