रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

बीडमध्ये वाघाचा हल्ला; चारा कापताना शेतकऱ्याचा मृत्यू

बीडच्या आष्टी तालुक्यातील देवळाली येथे चारा कापायला गेलेल्या शेतकरी देविदास टकले यांच्यावर वाघाने हल्ला केला. वाघाने त्यांना अर्धा किलोमीटर फरफटत नेले आणि त्यांचा मृत्यू झाला.

बीडमध्ये वाघाचा हल्ला; चारा कापताना शेतकऱ्याचा मृत्यू

दुष्काळात जनावरांसाठी चारा शोधायला गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यात घडली आहे. देवळाली येथील शेतकरी देविदास टकले यांना वाघाने अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. वडिलांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या मुलाला रक्ताच्या खुणांवरून या हल्ल्याचा थरार समजला. मुलाच्या आरडाओरड्याने वाघाने पळ काढला, मात्र तोपर्यंत वडिलांचा मृत्यू झाला होता.

हल्ला वाघानेच केला, तपासणीत स्पष्ट

हा हल्ला वाघानेच केला आहे, हे पोस्टमार्टम रिपोर्ट, जखमांच्या खुणा आणि वन विभागाच्या तपासणीमध्ये आढळून आले आहे. गेल्या महिनाभरापासून वाघ आष्टी आणि पाटोदा परिसरात होता. या वाघाचे लोकेशन देवळाली परिसरात होते, असे वनपरिक्षेत्राधिकारी अमोल मुंडे यांनी सांगितले. वाघ या परिसरात आहे, यासंदर्भात जनजागृती केली होती. मात्र दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चाऱ्याच्या शोधात हा शेतकरी गेला होता. त्या परिसरात सीसीटीव्ही ट्रॅप कॅमेरे लावले आहेत आणि परिसरात जनजागृती केली जात असल्याचे परिक्षेत्राधिकाऱ्यांनी सांगितले.

वाघाच्या बंदोबस्ताची मागणी

या घटनेनंतर देवळाली, बावी आणि धामणगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. परिसरात वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वीही याच रामलिंग परिसरात वाघाच्या हल्ल्यात राजेंद्र गोल्हार यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या वाघाला तातडीने रेस्क्यू करून जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे, असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले. ट्रॅप कॅमेरे लावून आवश्यक कार्यवाही करण्याचा पाठपुरावा सुरू आहे. वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत दौलावडगाव जिल्हा परिषद सर्कल व देवळाली पंचायत समिती गणातील नागरिकांनी एकट्याने शेतात किंवा जंगल परिसरात जाऊ नये, असे आवाहन आमदार धस यांनी परिसरातील ग्रामस्थांना केले आहे.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance