सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सिन्नर प्रभाग १३: जुन्या सरदवाडी रस्त्याची दुरवस्था

सिन्नर प्रभाग १३ मधील जुना सरदवाडी मार्ग २५ वर्षांपासून दुरवस्थेत आहे. खड्डे, पावसाळ्यात साचणारे पाणी आणि खुल्या भूखंडांवरील कचऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

सिन्नर प्रभाग १३: जुन्या सरदवाडी रस्त्याची दुरवस्था

सिन्नर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये गावठा भागापासून ते पवार शाळेपर्यंत, उन्नती क्लासेसपासून ते नवजीवन डे स्कूलपर्यंतचा परिसर येतो. मूळ शहर आणि उपनगरे अशी प्रभागाची रचना असल्याने शहर आणि उपनगरांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. यामध्ये जुना सरदवाडी मार्ग वाहतुकीयोग्य राहिला नसून, हा प्रश्न नागरिकांना सर्वाधिक भेडसावतो आहे. त्यातच खुले भूखंड विकसित नसल्याने त्यांच्या विकासाचीही मागणी होत आहे.

प्रभागातील दत्तमंदिरमार्गे जाणाऱ्या जुन्या सरदवाडी रस्त्याची समस्या मोठी आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे, त्यातच पावसाळ्यात या मार्गाला येणारे तलावाचे स्वरूप यामुळे हा मार्ग आहे की तलाव, असा प्रश्न नागरिकांना पडतो. हा मार्ग तसा सर्वाधिक जुना आहे. २५ वर्षांपासून या मार्गाची साधी डागडुजीही झालेली नाही. उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने रहदारीही मोठी आहे. तथापि, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने या मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाची मागणी होत आहे.

वीजतारा, कचरा आणि पाण्याच्या टाकीची गळती

गावठा भागात वीजतारांचे जाळे आणि रस्त्यांचे प्रश्न सर्वाधिक आहेत. हा मूळचा शहराचा भाग असल्याने रस्ते व वीज ही मोठी समस्या या परिसराची आहे. या भागात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. काही भागात रस्ते अजून होणे बाकी आहे. घरांच्या जवळून जाणाऱ्या वीजतारांनी रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. शिवाजीनगर परिसरात खुल्या भूखंडांना बकाल स्वरूप आले आहे. त्यांची स्वच्छता आणि विकास करण्याची मागणी आहे. वरंदळ मळ्यात खुल्या भूखंडावर कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पांडवनगरी आणि वरंदळ मळ्यात कॉलनी रस्ते होणे अजून बाकी आहे. शिवाजीनगरातील पाण्याच्या टाकीला गळती आहे. ती नव्याने उभारण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाण्याचे नियोजन व्हावे, पाण्याची वेळ आणि दिवस निश्चित व्हावे, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

काही कामे मार्गी, काही प्रस्ताव मंजूर

वरंदळ मळा आणि शिक्षक कॉलनीतील बहुतांश रस्ते तसेच सांडपाणी व्यवस्था चांगली आहे. प्रभागातील सर्वाधिक महत्त्वाचा रस्ता म्हणून पवार शाळा मार्गाकडे पाहिले जाते. या मार्गाची दुरवस्था झाली होती. हा मार्ग काँक्रिटीकरण केल्याने उपनगरांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शिक्षक कॉलनीकडे जाणारे रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. बालाची कॉलनीत रस्त्याचे काम सुरू आहे. प्रभागात दोन ट्रान्स्फॉर्मर नव्याने बसविल्याने वीज समस्या सुटण्यास मदत झाली आहे.

प्रभागासाठी जुना सरदवाडी मार्ग काँक्रिटीकरण, पांडवनगरी आणि हुसेनबाबा नगरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, शिवाजीनगर जलकुंभाची नव्याने उभारणी आणि पवार शाळा ते पाचोरे मळा शिवनदीवर पूल उभारणी असे प्रस्ताव नियोजित आहेत. नगरसेवक अमोल झगडे यांच्या म्हणण्यानुसार जुना सरदवाडी मार्ग काँक्रिटीकरण होणार असून दिवाळीनंतर हे काम सुरू होऊ शकेल. नगरसेवक गीता वरंदळ यांनी इतर मूलभूत प्रश्न सोडविण्यावर भर दिला असल्याचे सांगितले.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance