रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण धूसर; भाजप संभ्रमात

शरद पवार घरी परतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र विलीनीकरणाची शक्यता धूसर असून भाजपच्या नेतृत्वातही संभ्रम आहे.

दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण धूसर; भाजप संभ्रमात

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल असताना ऐन दिवाळीत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेने उचल खाल्ली आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होण्याची शक्यता धूसर असल्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार यांच्याबरोबर जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे शीर्षस्थ नेतृत्व फारसे उत्सुक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी शरद पवार सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होतील किंवा कसे, याबाबत भाजप साशंक असल्याचे समजते.

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असताना राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. त्यात प्रफुल पटेल यांचाही समावेश होता. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला. मात्र सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने शरद पवार यांच्यासोबत जाण्यास ठाम नकार दर्शवला आहे. राष्ट्रवादीतील एका मोठ्या नेत्याने ‘हे होणार नाही’, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. शरद पवार यांना हवे असल्यास त्यांनी स्वतंत्रपणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी व्हावे, असेही या नेत्याने सांगितले.

भाजपच्या मनात काय?

विलीनीकरणासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष तयार होण्याची शक्यता धूसर असल्याने शरद पवारांनी आघाडीला पाठिंबा दिल्यास त्यांना केंद्रात किंवा राज्यात किती आणि काय द्यायचे, तसेच ते नक्की सामील होतील किंवा कसे, याबाबत भाजपच्या नेत्यांमध्ये अद्याप पक्के ठरलेले नाही. शरद पवार आघाडीत येणार असतील तर आठ खासदारांच्या बळावर केंद्रात त्यांना एखादे मंत्रिपद मिळणे शक्य आहे. मात्र राज्यात दहा आमदारांच्या बळावर चौथा भागीदार सत्तेत सहभागी झाल्यास त्यांना किती मंत्रिपदे द्यायची, हाही मुद्दा आहे.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात भाष्य केले. ‘ते दोन्ही पक्ष स्वतंत्र असून त्यांचे त्यांचे निर्णय ते घेतील. त्यांच्या पक्षात शरद पवार यांच्यासारखे मोठे नेते आहेत. तिकडे सुनेत्रा पवार आहेत, प्रफुल पटेल, सुनील तटकरेही आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणे योग्य ठरणार नाही’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पवारांची भेट आणि भाजपची साशंकता

शरद पवार यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पार्थ पवार शरद पवार यांना भेटल्याचे स्पष्ट करण्यात आले.

शरद पवार नक्की काय करतील, याचा नेम नाही, असेच भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला वाटत आहे. पवार नेहमीच असे वातावरण तयार करतात. आता सत्तेत जायचेच असे दाखवत पक्षातील आमदार-खासदारांतील अस्वस्थता कमी करतात आणि ऐनवेळी माघारी फिरतात, असा अनुभव असल्याचे भाजपच्या मोठ्या नेत्यांचे म्हणणे आहे.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance