दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक मंत्र्याने शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून तिथेच जेवण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मुख्यमंत्री स्वतः नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामी राहिले आणि तिथेच जेवले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही त्याच गावातील नंदुजी लोहे या शेतकऱ्याच्या घरी मुक्कामी राहिले.
स्वयंपाकाला उशीर, तरीही त्याच घरात जेवण
काही कारणांमुळे लोहे यांच्या घरातील स्वयंपाकाला उशीर झाला. मुख्यमंत्री यांच्या जेवणानंतर शेतकऱ्यांसोबत संवादाची वेळ झाली, मात्र तोवर बावनकुळे यांचे जेवणच झाले नव्हते. अशात काही कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांना दुसऱ्या घरात जेवण करण्याचा सल्ला दिला. मात्र बावनकुळे यांनी कितीही उशीर झाला तरी ज्या शेतकऱ्याने घरी राहायला जागा दिली, त्याच शेतकऱ्याच्या घरी जेवणार, त्या शेतकऱ्याचा स्वाभिमान दुखावणार नाही, अशी भूमिका घेतली.
अखेर शेतकरी संवादाचा कार्यक्रम सुरू झाला आणि बावनकुळे त्यात जेवताच सहभागी झाले. कार्यक्रम संपवून सर्व शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज स्वीकारून त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिल्यानंतर बावनकुळे पुन्हा नंदुजी लोहे यांच्या घरी पोहोचले. तोवर सव्वा अकरा वाजले होते. अखेर बावनकुळे यांनी साडे अकरा वाजता लोहे कुटुंबीयांसोबत जेवण करत साधेपणाने दिवाळी साजरी केली. ज्या शेतकऱ्याने प्रेमाने घरी राहण्याची परवानगी दिली, त्याच्या घरी जेवणाला तास दोन तास उशीर झाला तरी त्या शेतकऱ्याची भावना महत्त्वाची असल्याची भूमिका बावनकुळे यांनी व्यक्त केली.
थंडीत शेकोटीजवळ शेतकऱ्यांशी संवाद
मुक्कामादरम्यान महसूल मंत्र्यांनी रात्री उशिरा थंडीत शेकोटीचा आनंद घेत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री दिवाळीनिमित्त लोहारी सावंगा गावात असताना नागपूरचे पालकमंत्री असलेले बावनकुळेही एका शेतकऱ्याच्या घरी मुक्कामी राहिले. या मुक्कामातून शेतकऱ्यांच्या अडचणी थेट जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply