शिवडी येथील १२ बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागेची किंमत आणि थकबाकी अदा केल्यानंतर संबंधित जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याची तयारी मुंबई पोर्ट प्राधिकरणाने दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या ३६ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ९६० कुटुंबांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई उपशहर सचिव चेतन पेडणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. ‘मुंबई पोर्ट प्राधिकरणाने जागा हस्तांतरणाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने आता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. जागेची किंमत आणि थकबाकी अदा करून हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावावा’, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. राज्य आणि केंद्र सरकारने समन्वय साधून पुनर्विकासाचा मार्ग काढावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. यासंदर्भात केंद्र सरकारच्या तक्रार निवारण यंत्रणेकडे केलेल्या तक्रारीला पोर्ट प्राधिकरणाकडून उत्तर मिळाले आहे.
१०० वर्षे जुन्या धोकादायक इमारती
शिवडीतील १२ बीडीडी चाळींमध्ये सुमारे ९६० कुटुंबे राहत आहेत. जवळपास १०० वर्षे जुन्या असलेल्या या इमारती धोकादायक अवस्थेत असून रहिवाशांना जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे. पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. जागा हस्तांतरणाचा प्रश्न सुटल्यास या चाळींच्या पुनर्विकासाला गती मिळू शकते. त्यामुळे दीर्घकाळ पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सदनिका योजना मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आश्रय योजनेअंतर्गत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत ३० वसाहतींचा ३५ प्रकल्पांच्या माध्यमातून तीन टप्प्यांमधून पुनर्विकास करण्यात येत आहे. यामध्ये ३०० चौरस फूट क्षेत्रफळाची ११ हजार ३७१ आणि ६०० चौरस फुटाची ७७३ घरे अशी एकूण १२ हजार १४४ घरे देण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेच्या सर्व २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवास्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांसह कंत्राटी आणि रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही किमान वेतन आणि त्यांच्या सोयी सुविधा देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुंबईचा खरा हिरो स्वच्छता कर्मचारी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply